अनागोंदीमुळे अडकले शिक्षकांचे वेतन
By Admin | Updated: February 3, 2015 22:59 IST2015-02-03T22:59:58+5:302015-02-03T22:59:58+5:30
बँक आॅफ इंडियाच्या येथील अधिकाऱ्यांच्या काम न करण्याच्या प्रवृत्तीमुळे पंचायत समितीच्या वेतनास विलंब होत आहे. या अडवणूक व गैरवर्तणुकीच्या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य

अनागोंदीमुळे अडकले शिक्षकांचे वेतन
वर्धा : बँक आॅफ इंडियाच्या येथील अधिकाऱ्यांच्या काम न करण्याच्या प्रवृत्तीमुळे पंचायत समितीच्या वेतनास विलंब होत आहे. या अडवणूक व गैरवर्तणुकीच्या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारे बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक नितीश नायक यांची क्षेत्रीय कार्यालय नागपूरकडे मंगळवारी तक्रार करण्यात आली़
राज्य शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ वेतन प्रणालीतील घोळ, वेतनाकरिता अनुदानाची अनुलब्धता, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली व प्रभार या कारणांमुळे जि़प़ च्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास विलंब झाला. त्यातही वर्धा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बदलल्याने येथील शिक्षकांच्या वेतनाचा धनादेश ३१ जानेवारीला मिळाला. यानंतर पं़स़ च्या लीपिक, शिक्षकांच्या वेतनाचे खाते असणाऱ्या बँक आॅफ इंडिया शाखेत धनादेश जमा करण्यास गेले असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी धनादेश जमा करण्यास नकार दिला़ वर्धा पं़स़ चे गटशिक्षणाधिकारी अशोक कोडापे व राज्य प्राथमिक शिक्षिक समितीचे प्रतिनिधी व्यवस्थापक नायक यांना भेटले असता त्यांनी धनादेश स्वीकारणे व कारणे सांगण्यासही नकार दिला़ दोन वर्षांपासून याच पद्धतीने वेतन दिले जातात, असे गटशिक्षणाधिकारी कोडापे व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले; पण व्यवस्थापकांनी काही स्पष्ट करण्यास नकार देत गटविकास अधिकाऱ्यांचे पत्रही स्वीकारले नाही.
बँक आॅफ इंडियाच्या या अनागोंदी कारभाराबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने क्षेत्रीय व्यवस्थापक प्रकाश भागवतकर यांच्याकडे तकार केली़ शिवाय जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडेही तक्रार करण्यात आली़(कार्यालय प्रतिनिधी)