वेतन विलंबाविरूद्ध शिक्षकांचे आक्रोश आंदोलन
By Admin | Updated: August 4, 2016 00:31 IST2016-08-04T00:31:42+5:302016-08-04T00:31:42+5:30
वेतन अपहार, अनावश्यक वेतन विलंब, पं.स. ची दिरंगाई, बीडीओंची मनमानी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची डोळेझाक या प्रकाराने सहा महिन्यांपासून शिक्षक त्रस्त आहे.

वेतन विलंबाविरूद्ध शिक्षकांचे आक्रोश आंदोलन
पंचायत समितीवर धडक : गटविकास अधिकाऱ्यांविरूद्ध संताप
समुद्रपूर : वेतन अपहार, अनावश्यक वेतन विलंब, पं.स. ची दिरंगाई, बीडीओंची मनमानी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची डोळेझाक या प्रकाराने सहा महिन्यांपासून शिक्षक त्रस्त आहे. याविरूद्ध शिक्षकांनी मंगळवारी पंचायत समिती गाठत आक्रोश आंदोलन केले. गटविकास अधिकाऱ्यांनी मात्र दखल न घेता काही घेणे-देणे नाही म्हणत हात झटकले. यामुळे शिक्षकांचा संताप अनावर झाला होता.
सहा महिन्यांपासून पं.स. अंतर्गत शिक्षकांचे वेतन दीड-दोन महिन्यांच्या विलंबाने होत आहे. यावर वेतन अपहाराचा प्रभाव पडला, असे एप्रिल महिन्यात प्रशासन सांगत होते; पण अद्याप ती स्थिती सुधारण्यास कुणीही जबाबदारी स्वीकारली नाही. वेतन विलंबामुळे एक लाख रुपयांच्या कर्जामागे प्रती महिना १३५० रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड पडत आहे. यामुळे शिक्षक त्रस्त आहेत. वेतनातून कपात रकमा चार महिन्यांपासून पं.स. मध्ये पडून आहे. शेड्युल तयार करून संबंधित बँक व विभागाकडे पाठविण्याची तसदी कुणीही घेत नाही. संबंधित अधिकारी डोळेझाक करीत आहे. शिक्षकांचे दैनंदिन, मासिक व कौटुंबीक आर्थिक व्यवहार प्रभावित झाले आहे. वेतन कार्यवाही नियमित करण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गुुंडे यांनी १५ जुलै च्या पत्रान्वये कडक निर्देश दिले; पण स्थानिक प्रशासन त्याला केराची टोपली दाखवत आहे.
जून महिन्याची वेतन विगतवारी पंचायत समितीला २९ जुलैला प्राप्त झाली; पण देयके लेखा विभागात सादर करण्यास पूढील महिन्याची १ तारीख निघाली. गटविकास अधिकाऱ्यांनी शेड्युलशिवाय वेतनाचा चेक देऊ नये, असे फर्मान लेखा विभागाला सोडले.