वेतनाच्या अनियमिततेमुळे शिक्षक त्रस्त
By Admin | Updated: March 6, 2015 01:53 IST2015-03-06T01:53:38+5:302015-03-06T01:53:38+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुखांच्या दरमहा वेतनास विलंबाचे ग्रहण लागले आहे. मार्च महिन्यातही जानेवारीचे वेतन मिळाले नाही.

वेतनाच्या अनियमिततेमुळे शिक्षक त्रस्त
वर्धा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुखांच्या दरमहा वेतनास विलंबाचे ग्रहण लागले आहे. मार्च महिन्यातही जानेवारीचे वेतन मिळाले नाही. ते होळीनंतरच मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर १४ चे वेतन फेब्रुवारी मध्ये मिळाले. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या प्राथमिक शिक्षक संघाने जि.प मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सीईओ संजय मीना यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याचे आश्वासन देत तसे आदेश शिक्षण विभागाला दिल्याची माहिती शिक्षक संघाने दिली.
गत वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. दरमहा उसनवार घ्यावी लागत आहे. शिवाय लाखो रुपये कर्ज घेतल्याने बॅँकेतील, एल.आय.सी मधील कर्जाचे हप्ते एक ते दीड महिना उशिराने जात आहे. यात ज्यादा व्याजाचा भुर्दंड शिक्षकांवर बसत आहे. अडीच हजार शिक्षकांचा विचार केला तर ही ज्यादा व्याजाच्या भुर्दंडाची वर्षभरातील रक्कम कोटीच्या घरात जाते. शिक्षकांचे हे नुकसान जि.प.ने भरून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांच्या दालनात शिक्षक संघाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. यावेळी जि.प.चे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी वाहुळे, उपशिक्षणाधिकारी धनराज तेलंग व शिक्षक संघाचे शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, कोषाध्यक्ष वसंत बोडखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांचे दरमहा वेतन वेळेत करण्यासाठी सीईओंनी कालबध्द कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश शिक्षण विभाग व वित्त विभागाला दिल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)