टी.बी. एमडीआरचे आता वर्धेत दोन तासांत निदान

By Admin | Updated: May 1, 2016 02:06 IST2016-05-01T02:06:40+5:302016-05-01T02:06:40+5:30

क्षयरोग, उपचार असला तरी जीवघेणा ठरणारा आजार. या आजाराची पहिल्या टप्प्याची चाचणी जिल्हास्तरावर होते;

T.B. Diagnosis of MDR in two hours in Ward | टी.बी. एमडीआरचे आता वर्धेत दोन तासांत निदान

टी.बी. एमडीआरचे आता वर्धेत दोन तासांत निदान

रुग्णांना दिलासा : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या क्षयरोग विभागात अत्याधुनिक मशीन
वर्धा : क्षयरोग, उपचार असला तरी जीवघेणा ठरणारा आजार. या आजाराची पहिल्या टप्प्याची चाचणी जिल्हास्तरावर होते; मात्र दुसऱ्या टप्प्यातील मशिन नसल्याने नमुना पाठवून माहिती येण्याकरिता किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता वर्धेतील रुग्णांना ही प्रतीक्षा करण्याची गरज नाही. जिल्हा पातळीवरच अवघ्या दोन तासांमध्ये क्षयरोगाच्या दुसऱ्या टप्प्याची एमडीआर चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी सीबी नॅट ही अत्याधुनिक मशिन जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्षयरोग कक्षात उपलब्ध करण्यात आली आहे. वर्धेत ही एकमेव मशीन आहे.
जिल्ह्यात क्षयरुग्णांची मोठी संख्या आहे. दरवर्षी त्यामध्ये भरही पडत आहे. क्षयरुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र क्षयरोग कक्ष आहे. क्षयरोगाच्या प्रारंभीच्या टप्प्यात सहा ते आठ आठवडे नियमित औषधोपचार घ्यावा लागतो; मात्र अनेकदा रुग्ण नियमित औषधोपचार घेत नसल्याने एमडीआर टप्प्यावर हा आजार पोहोचतो. अशा रुग्णांचे निदान करण्यासाठी यापुर्वी जिल्हा पातळीवर मशीन उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागपूरच्या प्रयोगशाळेत रुग्णाचे नमुने पाठवावे लागत होते. त्यामध्ये बराच वेळ खर्ची व्हायचा. जवळपास पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर नमुन्याची माहिती मिळायची. जिल्हा सामान्य रुग्णालयाला सीबीनॅट ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध व्हावी, अशी मागणी प्रशासनातर्फे करण्यात आली होती. प्रशासनाच्या मागणीनुसार केंद्रीय आरोग्य विभागातर्फे ही मशीन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या क्षयरोग विभागात उपलब्ध करण्यात आली आहे. या मशिनच्या सहायाने क्षयरोग आणि एमडीआरचे निदान अवघ्या दोन तासांत होणार आहे. परिणामी, वेळेची बचत होऊन रुग्णांना तातडीने औषधोपचारही लवकरच करता येणार असल्याचे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)

खासगीत एका तपासणीकरिता अडीच हजारांचा खर्च
एमडीआर चाचणी करीता जिल्ह्यात एकही मशीन उपलब्ध नाही. ती नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात होते. सोबतच काही खासगी रुग्णालयातही त्याची व्यवस्था आहे. मात्र याकरिता रुग्णाला साधारणता: २ हजार ५०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. या भुर्दंडापासून जिल्ह्यातील रुग्णांची सुटका होणार आहे. शिवाय वर्धेतील दोन मोठ्या रुग्णालयातही मशीन नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात ही एकमेव मशीन असून त्याचा लाभ जिल्ह्यातील क्षयरोग अधिकाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

Web Title: T.B. Diagnosis of MDR in two hours in Ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.