तहसील व पंचायत समितीवर महिलांची धडक

By Admin | Updated: July 30, 2016 00:35 IST2016-07-30T00:35:18+5:302016-07-30T00:35:18+5:30

नजीकच्या मसाळा येथे ग्रामपंचायत मालकीच्या गावठाण जागेवर गत ३० वर्षांपासून ४२ कुटूंब वास्तव्यास आहे.

Tasheel and Panchayat Samiti | तहसील व पंचायत समितीवर महिलांची धडक

तहसील व पंचायत समितीवर महिलांची धडक

३० वर्षापासून वास्तव्य, तरीही योजनांपासून वंचित
आकोली : नजीकच्या मसाळा येथे ग्रामपंचायत मालकीच्या गावठाण जागेवर गत ३० वर्षांपासून ४२ कुटूंब वास्तव्यास आहे. जागेचा मालकी हक्क नसल्यामुळे अनेकांची दारिद्ररेषेखालील यादीत नावे असताना त्यांना शासकीय योजनाचा लाभ मिळत नाही. जागेचा मालकी हक्क मिळावा याकरिता विरांगणा ग्रामसेवा संघ, श्रीकृष्ण युवा क्रीडा मंडळाचे युवक व महिलांनी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
४२ कुटुंब ज्या जागेवर वास्तव्यास आहेत ती जागा गावठाणची असल्याचे तलाठी रेकॉर्डला नमूद आहे. ३० वर्षे झाली तरी त्यांना जागेचे मालकी हक्क देण्यात आले नाही. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा प्रत्येक सरपंच, सचिवांची भेट घेवून जागेचे मालकी हक्क मिळण्याबाबत विनंती केली; मात्र प्रत्येकवेळी त्या-त्या कालखंडातील सरपंच व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागणीला केवळ केराची टोपलीच दाखविली नाही तर तोंडाला पानेही पुसली.
येथे वास्तव्यास असलेली बहुतेक कुटूंब ही भूमिहिन आहेत काही अपवादही असतील; मात्र भूमिहिनाची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे बहुतेकांची नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत आहे. अनेकांची घरे मोडकळीस आलेली आहे.
शासन घरकुल, शौचालय वा अन्य सवलतीच्या योजना राबविते; मात्र मालकी हक्काची जागा नाही हे कारण पुढे करीत प्रत्येकवेळी हक्क नाकारला जातो. ढिम्म लोकप्रतिनिधींची उदासिन भूमिका याला कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महिलांनी तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांना निवेदन दिले. महिलांचे म्हणणे त्यांनी सहानुभूतीपुर्वक ऐकून घेतले व संबंधितांना त्याचक्षणी सूचना दिल्या. गटविकास अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. संबंधितांनी दखल घेत या महिलांना न्याय देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)

भूमापन खात्याकडे गावठाण जागेची मोजणी करण्याबाबतचा अर्ज केला आहे. मोजणीची ‘क’ प्रत प्राप्त होताच अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यासंबंधीच्या कार्यवाहीला वेग येईल. येत्या दोन-तीन महिन्यात मालकी देण्याचा प्रयत्न आहे.
- प्रणाली गौळकर, सरपंच, ग्रामपंचायत मदनी (आम.)

अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत मासिक सभेत ठराव घेण्यात आला आह. त्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात आली आहे.
- जया राठोड, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, आमगाव (मदनी)

 

Web Title: Tasheel and Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.