अतिक्रमणधारकांची तालुका कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:22 IST2018-07-09T22:22:15+5:302018-07-09T22:22:35+5:30
नजीकच्या आलोडी भागात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या ५७ कुटुंबियांना वर्धा तालुका प्रशासनाच्यावतीने येत्या सात दिवसात अतिक्रमण काढण्याचा नोटीस बजावला. सदर नोटीस शनिवारी प्राप्त झाल्यानंतर सोमवारी आलोडी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली.

अतिक्रमणधारकांची तालुका कचेरीवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नजीकच्या आलोडी भागात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या ५७ कुटुंबियांना वर्धा तालुका प्रशासनाच्यावतीने येत्या सात दिवसात अतिक्रमण काढण्याचा नोटीस बजावला. सदर नोटीस शनिवारी प्राप्त झाल्यानंतर सोमवारी आलोडी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
तहसीलदारांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळात युवा परिवर्तन की आवाजचे निहाल पांडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ आदींची उपस्थिती होती. आलोडी येथील अतिक्रमणधारकांना प्राप्त झालेल्या नोटीस मध्ये त्यांनी केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्याचा सुचना करण्यात आल्या होत्या. सदर नोटीसकडे दुर्लक्ष करण्यात आल्यास अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येईल, अशी सुचनाही करण्यात आले होते. सदर नोटीस आलोडी भागातील शासकीय जागेवर सुमारे ३० वर्षांपासून अतिक्रमण करून राहणाऱ्या ५७ कुटुंबियांना देण्यात आल्यावर त्यांच्यात तालुका प्रशासनाबाबत रोष निर्माण झाला होता. संतप्त अतिक्रमणधारकांनी सोमवारी सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात न्यायासाठी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसील कार्यालयाच्यावतीने होणारी कार्यवाही अतिक्रमण धारकांवर अन्यायकारक असल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ यांनी थेट तहसील कार्यालय गाठले. त्यानंतर युवा परिवर्तन की आवाजचे निहाल पांडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ यांनी तहसीलदार मनोहर चव्हाण व नायब तहसीलदार शकुंतला पाराजे यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात पलाश उमाटे, समिर गिरी, गौरव वानखेडे, पंकज गणोरे, अक्षय बाळसराफ, शेखर इंगोले, सोनू दाते, सौरभ माकोडे यांच्यासह अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.