तळेगाव, आंजी परिसराला वादळाचा फटका
By Admin | Updated: May 5, 2017 01:52 IST2017-05-05T01:52:58+5:302017-05-05T01:52:58+5:30
जिल्ह्यात बुधवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसला. काही भागात या वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

तळेगाव, आंजी परिसराला वादळाचा फटका
आकोली, वायगाव येथे वीज पडून बैल ठार
वर्धा : जिल्ह्यात बुधवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसला. काही भागात या वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या वाऱ्यामुळे आंजी भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तळेगाव (श्यामजीपंत) परिसरातील शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले. वायगाव येथील शेतकऱ्याचे पॉलीहाऊस उद्ध्वस्त झाले. तर वीज कोसळून आकोली व वायगाव येथे वीज पडून बैल ठार झाला.
तळेगाव परीसरात रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वारा व विजेच्या कडकडासह पाऊस झाला. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. येथे शेतात काढुन ठेवलेले कांदाचे पीक पावसाने भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाडाखाली उभ्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर झाड उन्मळुन पडल्याने ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
दोन बैल ठार, गुरे बचावली
आकोली- रात्री झालेल्या वादळी पावसात झाडाखाली बांधून असलेल्या बैलावर वीज कोसळली. यात बैल ठार झाला. इतर गुरे दावे तोडून पळाल्याने बचावली. यात शेतकऱ्याचे ४५ हजाराचे नुकसान झाले असून ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. सदर घटना नजीकच्या खर्डा शिवारात घडली. लक्ष्मण पचारे रा. सुकळी (बाई) यांनी शेतातील झाडाखाली गुरे बांधली होती. आज सकाळी शेतात जावून पाहिले झाड जळालेले दिसले व बैल मृतावस्थेत आढळून आला. तलाठी संजय नासरे यांनी पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्छेदन केले. या शेतकऱ्याला शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.
वायगाव लगतच्या तळेगाव (टालाटुले) येथील देवराव बळवंत देशमुख यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास वीज कोसळली. यात एका बैलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती दिल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.