रेती तस्करांचा तलाठी व कोतवालावर हल्ला
By Admin | Updated: March 1, 2016 01:25 IST2016-03-01T01:25:45+5:302016-03-01T01:25:45+5:30
रेतीची वाहतूक करताना दिसलेल्या ट्रॅक्टर चालकाला रॉयल्टी विचारल्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांना मिळून कानगाव साझाचे तलाठी व कोतवालावर हल्ला केला.

रेती तस्करांचा तलाठी व कोतवालावर हल्ला
एक जखमी : सिरसगाव शिवारातील घटना
हिंगणघाट : रेतीची वाहतूक करताना दिसलेल्या ट्रॅक्टर चालकाला रॉयल्टी विचारल्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांना मिळून कानगाव साझाचे तलाठी व कोतवालावर हल्ला केला. ही घटना रविवारी अल्लीपूर-सिरसगाव मार्गावर रात्री ७ वाजता घडली. या मारहाणीत तलाठी रामकृष्ण घवघवे गंभीर जखमी झाले तर वेळीच पळ काढल्याने कोतवाल थोडक्यात बचावला. जखमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे
या प्रकरणी वडनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कार जप्त करण्यात आली आहे. प्रशांत बोरकर व दीपक पाटील दोघेही रा. शिरसगाव अशी त्यांची नावे आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वडनेर पोलिसांनी दिली.
जिल्ह्यात अवैध रेती उपसा होत असल्याने त्यावर आळा घालण्याकरिता पोलीस व महसूल विभागाच्यावतीने संयुक्तरित्या कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे रेती माफीयांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेंतर्गतच रस्त्याने रेती घेवून जात असलेल्या ट्रॅक्टर चालकाला रेतीची रॉयल्टी विचारली असता त्याने ती नसल्याचे सांगितले. त्याला वाहन रस्त्याच्या कडेला घेण्यासंदर्भात सांगितले. दरम्यान मागाहून आलेल्या एका कारमधील पाच ते सहा युवकांनी तलाठी घवघवे व कोतवाल करपते या दोघांवर हल्ला केला. यात कोतवाल पळ काढण्यात यशस्वी झाला. तर मारहाणीत तलाठी जखमी झाला. जखमीला परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती तहसीलदार दीपक करंडे यांना दिली. घटनेची माहिती प्रारंभी हिंगणघाट पोलिसांना देण्यात आली. त्यांनी प्रकरण दाखल करून घटनास्थळ वडनेर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने ते त्यांच्याकडे वर्ग केले. वडनेर पोलिसांनी जखमीचे बायाण नोंदवित मारहाण करणाऱ्यांवर भादंविच्या कलम ३५३, ३३२, १८६, १४९, १४९ १४७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तलाठ्याच्या तोंडी प्रशांत बोरकर व दीपक पाटील या दोघांची नावे आल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास वडनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एच. यादव करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यात रेतीमाफिया शिरजोर
शासनाकडून घाटाचा लिलाव न करताही वर्धा जिल्ह्यात रेतीचा उपसा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय कारवाई करण्याकरिता गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही हल्ले झाले आहेत. असे असताना रेती माफीयांवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने अद्यापही कडक कारवाई करण्याचे संकेत दिसत नाही. यातूनच सिरसगाव येथील प्रकार घडल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. यामुळे जिल्ह्यातील रेती माफीयांची लगाम कसण्याकरिता कडक कारवाईची मागणी आहे. यामुळे तरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने रेती माफीयांवर कारवाई होते काय याकडे साऱ्यांचे लक्ष आह
मंडळ अधिकारी तलाठ्यांचे कामबंद आंदोलन
या घटनेचा महसूल विभागाच्यावतीने निषेध नोंदिवण्यात आला आहे. यात हिंगणघाट साझ्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी कामबंद आंदोलन करून काळ्या फिती लावित उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली.