हेराफेरी करणारा तलाठी निलंबित
By Admin | Updated: July 2, 2014 23:24 IST2014-07-02T23:24:13+5:302014-07-02T23:24:13+5:30
फेब्रुवारी - मार्च २०१४ मध्ये तालुक्यातील गारपिटग्रस्तांच्या अनुदानांत १ लाख ३३ हजार ५०० रुपयांची हेरीफेरी करण्यात आली़ यातील तलाठी महेश कावरे यास अखेर शेतकऱ्यांच्या मागणीवरून

हेराफेरी करणारा तलाठी निलंबित
गारपीटग्रस्तांचे अनुदान : १ लाख ३३ हजार ५०० रुपयांची अफरातफर
कारंजा (घा़) : फेब्रुवारी - मार्च २०१४ मध्ये तालुक्यातील गारपिटग्रस्तांच्या अनुदानांत १ लाख ३३ हजार ५०० रुपयांची हेरीफेरी करण्यात आली़ यातील तलाठी महेश कावरे यास अखेर शेतकऱ्यांच्या मागणीवरून मंगळवारी उपविभागीय अधिकारी आर्वी यांनी निलंबित केले. यात तलाठ्यास साथ देणाऱ्या कोतवालास यापूर्वीच तहसीलदार बालपांडे यांनी निलंबित केले आहे.
ब्राह्मणवाडा, दानापूर, चोपण, फेफरवाडा, पांजरा (गोंडी), खैरवाडा, ममदापूर या गावांत जोरदार वादळी पाऊस व गारपीट झाले़ यात शेतकऱ्यांच्या पिकांसह बगिच्यांचे नुकसान झाले़ नुकसानीची पाहणी ग्रामसेवक महेश कावरे व कृषी सहायकाने संयुक्तरित्या केली़ अहवाल तहसीलदारांमार्फत शासनास सादर करण्यात आला़ यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत तलाठी महेश कावरे व कोतवाल भीमचरण तायडे यांनी घोळ केला. स्वत:च्या नावावर व नातलगांच्या नावे ओलिताची जमीन नसताना १ लाख ३३ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई काढली. कोतवालाचे तोंडही नुकसान भरपाई देत बंद केले.
पांजरा (गोंडी) येथील तलाठी कावरेची आई शोभा कावरे यांच्या नावे १५ हजार, सतीश कावरे २४ हजार, मावस भाऊ भूषण पेशाले यांच्या नावे २७ हजार व विष्णू पेशाले यांच्या नावावर २७ हजार रुपयांचा निधी लाटला़ शिवाय स्वत:च्या नावाने ९३ हजार रुपयांचा निधी उचलला. तलाठी व कोतवालाने जमीन नावावर नसताना गारपीटग्रस्त म्हणून रकमेची हेरीफेरी करण्याचा महाप्रताप केला.
यादीतील घोळ चोपणचे सरपंच व ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तहसीलदारांना ही बाब लक्षात आणून दिली़ अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नावांचेही तलाठ्याने जादा अनुदान काढले़ काही पात्र शेतकऱ्यांचे कमी अनुदान काढले. खैरवाडातील यादीत क्ऱ८९ वरील शेतकऱ्याच्या नावावर पांढरी शाई लाऊन त्यावर स्वत:चे नाव लिहून ६ हजार २५० रुपये उचलले. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)