सेवाग्राम विकास आराखड्याची कामे पूर्णत्वास न्या
By Admin | Updated: July 24, 2015 01:48 IST2015-07-24T01:48:13+5:302015-07-24T01:48:13+5:30
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सेवाग्राम आश्रम परिसरास वर्धा व पवनार येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांच्या ...

सेवाग्राम विकास आराखड्याची कामे पूर्णत्वास न्या
अनुप कुमार यांच्या सूचना : आश्रम परिसरातील विकासकामांना प्राधान्य
वर्धा: सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सेवाग्राम आश्रम परिसरास वर्धा व पवनार येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासोबतच पर्यटकांना आवश्यक सुविधा तसेच महात्मा गांधी संसाधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण आदींचा समावेश असलेला सेवाग्राम विकास आराखड्याची कालबद्ध कार्यक्रमानुसार अंमलबजावणी करावी, अशी सूचना विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी गुरुवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित सेवाग्राम विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजित संगने, महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता विजय जलतारे, नियोजन विभागाचे उपायुक्त श्रीकांत धर्माळे, अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, आधारकर असोसिएटच्या मीरा आडारकर, अरूण काळे, योगेश खंडारे, पी.पी. पांडे, एमगिरीचे डॉ. प्रफुल्ल काळे, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, कार्यकारी अभियंता एस. यू. चौधरी, उपअभियंता एन.व्ही. बोरकर आदी उपस्थित होते.
सेवाग्राम विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना सेवाग्राम येथे भेट देणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महात्मा गांधी यांच्या कार्याची ओळख व्हावी तसेच सेवाग्राम परिसरताील ऐतिहासिक महत्त्व असलेले वास्तूंचे जतन व संवर्धन त्यासोबतच परिसराच्या सर्वांगीन विकासाला प्राधान्य देऊन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीची यांच्या समन्वयाने एकत्रित विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना करतानाच विभागीय आयुक्त अनुप कुमार म्हणाले की, संकल्प आराखडा तयार केल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीतर्फे मंजुरी प्रदान करण्यात येईल.
प्रारंभी आडारकर असोसिएटच्यावतीने नीरा आडारकर यांनी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सेवाग्राम तसेच पवनार येथील महत्वाच्या स्थळांच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याची ओळख जगासमोर यावी, यादृष्टीने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण यावेळी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी स्वागत करून सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत संसाधन व प्रशिक्षण केंद्र तसेच या आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये विविध विभाग तसेच आश्रम प्रतिष्ठान व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने आराखड्याला सुरूवात करण्यात येईल, तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मंजुरीनंतर आराखड्याला अंतिम मान्यता घेण्यात येईल, असेही सांगितले.
विकास आराखड्यांतर्गत महात्मा गांधी संसाधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत ग्रामीण भागातील विविध कुटीरोद्योगांच्या विकासाला सहाय्यभूत ठरेल, अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पर्यटन विकासाकरिता विविध कार्यक्रम
सेवाग्राम विकास आराखडा राबविताना शाश्वत पर्यटन विकास, पर्यावरण विकास, सेवाग्राम आश्रम परिसरातील विकास, वर्धा शहरातील महत्त्वाच्या स्थळांच्या विकासासोबतच हेरीटेज वॉक संसाधन प्रशिक्षण केंद्र, पवनार धाम नदी परिसराचा विकास, नागपूर-बुटीबोरी मार्गावर संकल्प चित्राच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या कार्याची ओळख तसेच माहितीच्या प्रसारणासाठी वेबसाईट मार्गदर्शक असणारे साईन बोर्डाने पर्यटन विकासाला प्रोत्साहन आदी कार्यक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.