नियमानुसार जमिनीचे अधिग्रहण करा
By Admin | Updated: November 16, 2014 23:11 IST2014-11-16T23:11:23+5:302014-11-16T23:11:23+5:30
निम्न वर्धा प्रकल्पातील बाधितांसाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. परंतु हे अधिग्रहण करताना नियमानुसार व शेतकऱ्यांना विश्वासात घेवून करण्यात यावे, अशी सूचना आ. डॉ. पंकज भोयर

नियमानुसार जमिनीचे अधिग्रहण करा
वर्धा : निम्न वर्धा प्रकल्पातील बाधितांसाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. परंतु हे अधिग्रहण करताना नियमानुसार व शेतकऱ्यांना विश्वासात घेवून करण्यात यावे, अशी सूचना आ. डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना केली. त्यामुळे सोमवारपासून होणारी सुनावणी रद्द केली आहे.
निम्न वर्धा प्रकल्पात बाधित ठरलेल्यांना जमिनीचे वितरण करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने सालोड, माळेगाव, हिरापूर, बाळापूर, सेलसुरा, मेघापूर येथील जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. परंतु हे अधिग्रहण करताना नियमाला डावलल्या जात असल्याचा आरोप करीत पीडित शेतकऱ्यांनी आ. डॉ. भोयर यांची भेट घेवून त्यांना माहिती दिली. शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेवून आ. डॉ. पंकज भोयर हे शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले व त्यांनी संपूर्ण प्रकार जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या लक्षात आणून दिला. जमिनीचे अधिग्रहण करताना संपादनस पात्र क्षेत्र दर्शविणाऱ्या गाव निहाय याद्या सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावी, या १८ गावांच्या याद्या पुनर्वसन कार्यालयाच्या फलकावरही लावण्यात याव्या, प्रसिद्ध केलेल्या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी अवधी देण्यात यावा व या अवधीनंतर अंतिम यादी प्रकाशित करण्यात यावी, संपादन पात्र जमिन ठरविताना ती जमीन २० जुलै १९८१ पूर्वीची धारण केलेली असल्याची शहानिशा करण्यात यावी अशी सूचना करून संपादनप्राप्त जमिनीमध्ये उपकालवा, लघू कालवा या कामाकरिता जमीन प्रस्तावित आहे का याचा अहवाल मागून संपादित जमीन अधिग्रहणातून वगळण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. अधिग्रहणाची कारवाई नियमांच्या विरूद्ध असल्याने महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९९९ भाग २ नुसार जमिनीचे अधिग्रहण करण्याची सुचना आमदारांनी केली. या सर्व बाबींची शहानिशा करूनच सुनावनिस प्रारंभ करण्यात यावा व १७ नोव्हेंबरपासून होत असलेली सुनावणी स्थगित करण्याची सूचना डॉ. भोयर यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी सोना यांनी सोमवारपासून होत असलेली सुनावणी स्थगीत करण्याचे आदेश देत या अधिग्रहणासंबंधी संपूर्ण माहिती देण्याचे आदेश संंबंधितांना दिले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, पं.स. सदस्य अशोक कलोडे उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे, मोतिराम टिपले, खुशाल खैरकार, आनंद कासटवार, आशिष कुचेवार, दिनेश वैतागे, सागर टिपले, कासावार उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)