गृहरक्षक व मार्शलवर कायदेशीर कारवाई करा
By Admin | Updated: January 16, 2016 02:34 IST2016-01-16T02:34:20+5:302016-01-16T02:34:20+5:30
संशयास्पद स्थितीत असलेल्या कार व दुचाकीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाच एका मार्शल व गृहरक्षकाने खोट्या तक्रारीत ...

गृहरक्षक व मार्शलवर कायदेशीर कारवाई करा
पोलीस अधीक्षकांना साकडे : खोट्या तक्रारीत फसविण्याची धमकी
वर्धा : संशयास्पद स्थितीत असलेल्या कार व दुचाकीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाच एका मार्शल व गृहरक्षकाने खोट्या तक्रारीत अडकविण्याची धमकी दिली. सोबतच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार एकता मैदान परिसरात घडला. या प्रकरणी मार्शल सचिन दीक्षित व गृहरक्षक मंगल पांडे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, अमित कावळे, आकाश भक्ते, अमर कोटनाके तिघेही रा. तुकाराम वॉर्ड रामनगर हे ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता एकता मैदान परिसरातून जात होते. दरम्यान, त्यांना एक पांढऱ्या रंगाची कार व व दुचाकी ही दोन वाहने अंधारात मैदानाच्या कोपऱ्यावर संशयास्पद उभी दिसली. तिघेही शहानिशा करण्यासाठी वाहनाजवळ गेले असता दोन अल्पवयीन मुलींसोबत सचिन दीक्षित व मंगल पांडे त्यांच्या नजरेस पडले. काही विचारण्याच्या आतच त्या दोघांनी तीनही नागरिकांना धमकावणे सुरू केले. शिवाय आपण मार्शल व गृहरक्षक असल्याचे सांगत सोबत असलेल्या मुलींना शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्या मुलींना या तिघांबद्दल खोट्या तक्रारी दाखल करण्याच्याही सूचना केल्या.
या तिघांनी वॉर्डातील देवस्थानचे अध्यक्ष महेश तेलरांधे यांना फोन केला. ते पोहोचेपर्यंत वाद सुरूच होता. गाडीची चावी मागितली असता त्या दोघांनी पुन्हा अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. तुम्ही माझे काहीच बिघडवू शकत नसल्याचेही सांगितले. यामुळे तेलरांधे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात फोन लावून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस घटनास्थळावर आले असता दीक्षित याने तिघांवरही खोटे आरोप करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
मार्शल बनल्यापासून सचिन दीक्षित याने रामनगर परिसरात हैदोस घातल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यामुळे या दोघांविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात तक्रारदारांसह महेश तेलरांधे, पवन राऊत, माया उमाटे, शुभांगी कोलते, चेतन खोंड, चुकेवार, येऊलकर आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)