शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा
By Admin | Updated: August 28, 2015 02:07 IST2015-08-28T02:07:46+5:302015-08-28T02:07:46+5:30
शहरातील वाहतूक सुरळीत करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता विभाजक तसेच आर्वी नाका चौक व बजाज चौकामध्ये ....

शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा
वर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता विभाजक तसेच आर्वी नाका चौक व बजाज चौकामध्ये वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी गुरुवारी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी सलिल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, समितीचे अशासकीय सदस्य प्रदीप बजाज, अनिल जगताप, नगर रचनाकार एस. व्ही. देशमुख, वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एच.डी. टाकरखेडे, मेघना वासनकर, विजय देशमुख, ए.आर. खोपडे, वर्धेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुनील मेसरे उपस्थित होते.
वर्धेच्या वाहतुकीला येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागातर्फे संयुक्त पाहणी करून आवश्यक त्याठिकाणी गतीरोधक लावण्यासोबतच फूटपाथची अपूर्ण कामेही तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. शिवाजी चौक, आर्वी नाका येथील रस्त्याच्यामध्ये येणाऱ्या विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर तत्काळ स्थलांतरित करण्याची कार्यवाही करावी. बजाज चौकाजवळ असलेल्या भाजी मार्केटमुळे रस्त्यावर अपघात होतात. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे, आर्वी चौक व बजाज चौकात वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने आयलँड विकसीत करणे, रस्ता दुभाजकासंबधीही बैठकीत निर्देश देण्यात आले.
सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक असते. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रीपेड आॅटो बुथ बसविण्या संदर्भातही समितीने निर्णय घेऊन नागपूर विभागीय नियंत्रकांकडून जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
रस्त्यावर होणाऱ्या अपघातासंदर्भात नागरिकांच्या माहितीसाठी मार्गदर्शक बोर्ड लावले. हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालकांना सिटबेल्ट वापरणे आदी संदर्भात जागृती मोहीम राबविण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली.
.प्रारंभी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा संदर्भातील समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णया संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रणासह अपघात प्रवणक्षेत्रात पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष उपक्रमाची माहिती दिली.(प्रतिनिधी)