स्थायी पट्टे देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा
By Admin | Updated: November 20, 2014 22:57 IST2014-11-20T22:57:59+5:302014-11-20T22:57:59+5:30
नालवाडी ग्रामपंचायत अंतर्गत सर्व्हे क्र. ५३ मध्ये आदिवासी कॉलनी येथील नागरिकांना जमिनीचे स्थायी स्वरुपी पट्टे देण्यात यावे, अशा सूचना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.

स्थायी पट्टे देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा
वर्धा : नालवाडी ग्रामपंचायत अंतर्गत सर्व्हे क्र. ५३ मध्ये आदिवासी कॉलनी येथील नागरिकांना जमिनीचे स्थायी स्वरुपी पट्टे देण्यात यावे, अशा सूचना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी एन. नवीन सोना व संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भोयर यांनी त्वरीत कार्यवाही करण्याचे सांगितले.
आ. भोयर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांच्याशी याविषयावर विस्तृत चर्चा केली. आ. भोयर यांनी संबंधितांना सांगितले की, नालवाडी सर्व्हे क्र. ५३ मध्ये आदिवासी कॉलनी असून ती शहराच्या प्रभाग २ मध्ये समाविष्ट आहे. कॉलनीत ३८२ घरांची वस्ती असून ही कॉलनी अतिक्रमण म्हणून संबोधण्यात येते. सन १९८४मध्ये १३.५ एकर जमिनीवर आदिवासी कॉलनी बेघर लोकांना दिली होती. परंतू अद्यापही येथील नागरिकांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्यात आले नाही. मागील २४ वर्र्षांपासून स्थायी पट्टा मिळावा यासाठी येथील नागरिक संघर्ष करीत आहे. सन २०१२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी एसडीओ यांना कॉलनीची मोजणी करून स्थायी पट्टे देण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते.
यावर एसडीओ यांनी मार्च २०१२ ला उपअधीक्षक भूमि अभिलेख यांना पत्र दिले. प्लॉटधारकांनी मोजणी फी एक हजार रुपये प्रति प्लॉट भरण्याचे पत्र दिले होते. यानंतर ३८२ पैकी जवळपास ३०५ नागरिकांनी मोजणी शुल्क भरले. यानंतर १० ते १३ मार्च २०१४ पर्यंत मोजणी करण्यात आली. याबाबत पुन्हा चौकशी करुन तातडीने कार्यवाही करण्याचे सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, पी. मसराम उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)