अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यांवर तत्काळ कारवाई करा
By Admin | Updated: July 4, 2015 00:24 IST2015-07-04T00:24:54+5:302015-07-04T00:24:54+5:30
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यांच्या संदर्भात तत्काळ कार्यवाही करा.

अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यांवर तत्काळ कारवाई करा
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : ३० दिवसांत आरोपपत्र सादर करा
वर्धा : अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यांच्या संदर्भात तत्काळ कार्यवाही करा. एखाद्या प्रकरणात केवळ न्यायालयात प्रकरण दाखल झाले म्हणून तपास थांबवू नका. ३० दिवसांच्या आत चार्जशीट सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सभेत दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यात दाखल झालेल्या १४ गुन्ह्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, समितीचे सदस्य डॉ. ए.एच. रिझवी, चंद्रशेखर झोड, डॉ. संजय तेलंग, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सदस्य सचिव बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.
दाखल होणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जात प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक प्रकरणांमध्ये विलंब होतो. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडून तत्काळ जात प्रमाणपत्र देण्याची स्वतंत्र व्यवस्था देण्यात येईल. अशा प्रकरणांचा तपास जलदगतीने करुन न्यायालयात प्रकरण सादर करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात येईल. यानंतर पोलीस अधीक्षक गोयल यांनी प्रत्येक प्रकरणाचा जलदगतीने तपास करुन ३० दिवसांत चार्जशीट सादर करण्याचा प्रयत्न करावा. न्यायालयाचा स्थगनादेश असेपर्यंत कोणत्याही प्रकरणाचा तपास थांबवू नका, अशा सूचना केल्या. जिल्ह्यात १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत १४ गुन्हे घडले आहे. यापैकी १३ प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)