जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करा
By Admin | Updated: August 26, 2014 00:10 IST2014-08-26T00:10:11+5:302014-08-26T00:10:11+5:30
अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिरूड येथे जादुटोण्याच्या संशयावरून जीवघेणा हल्ला करण्यात आला़ या प्रकरणात पोलिसांनी भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला़ या प्रकरणात जादुटोणा

जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करा
वर्धा : अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिरूड येथे जादुटोण्याच्या संशयावरून जीवघेणा हल्ला करण्यात आला़ या प्रकरणात पोलिसांनी भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला़ या प्रकरणात जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे़ या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले आहे़
गुरूवारी अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत शिरूड येथे जादुटोण्याचा संशय घेऊन जीवघेणा हल्ला करण्यात आला़ यात आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ वास्तविक डॉ़ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आलेल्या जादुटोणा विरोधी कायद्याच्या कलम ३ (२), ६ अन्वये गुन्हा दाखल करणे गरजेचे होते़ यामुळे जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी रविवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची भेट घेत निवेदन सादर केले़
शिरूड येथे विजय उरकुडकर याने जादुटोणा, करणी करते, असे म्हणत गुरूवारी सकाळी पानटपरी उघडत असताना दशरथ उरकुडकर यांच्यावर अचानक गुप्तीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले़ घटनेनंतर काही न झाल्याचा आव आणत आरोपी शेतात गेला़ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी विजय उरकुडकर यास भादंविच्या कलम ३०६ अन्वये अटक केली़
जादुटोण्याच्या संशयाचा प्रश्न असल्याने गजेंद्र सुरकार, किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, भाकपचे राजू गोरडे, प्रजासत्ताक शिक्षक व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण हर्षबोधी, प्रकाश कांबळे, प्रभाकर पुसदकर, नरेंद्र कांबळे, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा़ नुतन माळवी, श्रेया गोडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले़ यावर त्वरित कारवाई करण्याची हमी दिली़ अल्लीपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता कायद्याची प्रत नसल्याने गुन्हा नोंदविला नाही, असे सांगण्यात आले़ यामुळे शिष्टमंडळाने अल्लीपूर पोलीस ठाण्यात विजय मगर यांना कायद्याची प्रत देत चर्चा केली़ यात वरिष्ठांची संमती घेऊन कारवाई करण्याची हमी दिली़ यानंतर शिष्टमंडळाने संबंधित कुटुंबाची भेट घेऊनही माहिती जाणून घेतली़(कार्यालय प्रतिनिधी)