बेशिस्त, भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा
By Admin | Updated: June 10, 2016 02:14 IST2016-06-10T02:14:56+5:302016-06-10T02:14:56+5:30
ग्रामीण रुग्णालयातील बेशिस्त वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद हे १५ ते २० वर्षांपासून काँग्रेसच्या

बेशिस्त, भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा
पत्रकार परिषदेतून शिवसेनेची मागणी
कारंजा (घा.) : ग्रामीण रुग्णालयातील बेशिस्त वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद हे १५ ते २० वर्षांपासून काँग्रेसच्या आशीर्वादाने कार्यरत होते. नोकरी करीत असताना शासकीय वेळेत ते खासगी दवाखानाही चालवित होते. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना शासकीय ऐवजी डॉ. शकील यांच्या खासगी दवाखान्यात अधिक पैसे देत उपचार घ्यावे लागत होते. अशा बेशिस्त अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून केली.
ग्रामस्थांनी अनेकदा प्रस्थापित पक्षाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या; पण डॉक्टरशी जवळीक असल्याने सामान्यांना न्याय मिळाला नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यानंतर तालुका प्रमुख संदीप टिपले यांच्या नेतृत्वात डॉ. शकील यांची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. २० डिसेंबर २०१५ रोजी शासकीय कामकाजाच्या दिवशी व वेळेत डॉ. शकील यांच्या खासगी दवाखान्यात शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, पदाधिकारी व शिवसैनिकांनी धाड टाकली. यात डॉ. शकील शासकीय दिवशी व वेळेत खासगी दवाखाना चालविताना आढळले. या धाडसत्राचा तपशील आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना सोपविला. यावरून आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागामार्फत तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या चौकशी अहवालात डॉ. शकील शासकीय दिवशी व वेळेत खासगी दवाखाना चालवित असल्याचे व रुग्णांकडून शासकीय दाखल्यासाठी पैसे घेत असल्याचे तसेच रुग्णांशी असभ्य वर्तणूक करीत असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर बाबींची दखल घेत त्यांची पेंडरी येथे बदली करण्यात आली. शिवाय त्वरित कार्यरत असलेले ठिकाण सोडून बदली झालेल्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले.
जिल्ह्यातील कामचुकार व भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करावी. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. सामान्य जनता तसेच शेतकऱ्यांना अकारण त्रास दिला जात असेल तर त्यांच्यावर योग्य कार्यवाही केली जाईल, असा इशाराही देशमुख यांनी पत्रपरिषदेतून दिला. यावेळी उपजिल्हा प्रमुख आर्वी विधानसभा क्षेत्राचे बंडू कडू, माजी उपजिल्हा प्रमुख गजानन ढोले, माजी तालुका प्रमुख प्रकाश घागरे, तालुका प्रमुख संदीप टिपले, अमोल चरडे, सारंग भोसले, ज्योती हरणे, प्रियंका वंजारी आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)