पाईकमारी येथील शिधा वाटप केंद्रचालकावर कार्यवाही करा
By Admin | Updated: May 27, 2016 01:57 IST2016-05-27T01:57:41+5:302016-05-27T01:57:41+5:30
तालुक्यातील पाईकमारी येथे शिधा वाटप केंद्र आहे. या कोंचालकाकडून मनमानी व आर्थिक लुट होत असल्याचा आरोप नागरिकांचा असून चौकशीची मागणी

पाईकमारी येथील शिधा वाटप केंद्रचालकावर कार्यवाही करा
संतप्त नागरिकांचे तहसीलदारांना साकडे
समुद्रपूर : तालुक्यातील पाईकमारी येथे शिधा वाटप केंद्र आहे. या कोंचालकाकडून मनमानी व आर्थिक लुट होत असल्याचा आरोप नागरिकांचा असून चौकशीची मागणी पाईकमारी येथील संतप्त नागरिकांची आहे. या प्रकरणी त्यांनी तहसीलदार सचिन यादव यांना निवेदन सादर केले आहे.
पाईकमारी येथे छाया गाठे यांच्याकडे शासकीय शिधा वाटप केंद्र आहे. सदर केंद्र नियमितपणे सुरू न ठेवता महिन्यातून फक्त दोन दिवसच ते उघडले जाते. त्यामुळे अनेक नागरिक शिधा वाटपापासून वंचित राहतात. ज्यांना धान्य मिळते त्यांच्याकडून अधिकचे पैसे घेवून आर्थिक लुट केल्या जाते. उरलेले धान्य केंद्रचालक काळ्या बाजारात अवैधपणे विकतो, असा आरोप नागरिकांनी निवेदनातून केला आहे. प्रत्येक शिधा केंद्र चालकाने शासनाच्या निर्देशाप्रमाणे दुकानाच्या दर्शनी भागावर ठळकपणे दिसेल असे फलक लावणे बंधनकारक आहे. या फलकावर दुकानाचे व दुकानदाराचे नाव कामाच्या वेळा, सुटीचे दिवस प्रत्येक दिवसाची होणारी आवक खप, शिल्लक साठा व किरकोळ विक्रीचे दर आदिंचा समावेश असने गरजेचे आहे. शिधा वस्तुचे वितरण शासनाच्या निरनिराळ्या अन्न योजना इत्यादीच्या लाभार्थीची यादी नागरिकांच्या छाननी करिता उपलब्ध करणे, इत्यादीची माहिती निरीक्षक समिती व यादी एकाच फलकावर दर्शविणे आवश्यक आहे.
या शिधा केंद्रचालकाकडून अशा कोणत्याही नियमाचे व निर्देशांचे बंधन पाळण्यात येत नाही. उलट मनमानी अवैध वसुली व लुट सुरू असल्याचे पाईकमारी गावच्या नागरिकांनी सांगितले. तक्रार वही ठेवणे व ती शिधाधारकांना उपलब्ध करून देणे आवश्यक व बंधनकारक असताना सुद्धा केंद्रचालकाने तशी कुठल्याही प्रकारची वही ठेवलेली नाही. धान्य दिल्यानंतर त्याच्या दराची व पूर्ण किंमतीची पावती देणे बंधनकारक असताना तशी कुठलीही पावती येथून दिल्या जात नसल्याचा आरोप आहे. सदर शिधा केंद्रचालकांची शासनाने योग्य व गंभीर दखल घेवून केंद्राची चौकशी करून योग्य न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी पाईकमारी गावातील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदनातून केली आहे.
निवेदन देतेवेळी मुकेश बाभुळकर, गजानन सुकळकर, रामदास बाभुळकर, विठ्ठल चावरे, दादा धोबे, रेखा शेंडे, विनोद मसराम, वैशाली चापरे, कविता राऊत, प्रमोद राऊत, चेतना गुरनुले, भाऊराव घुडे, वृषभ राऊत यांच्यसह गावातील नागरिकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)