तहसील कार्यालयाचे वाहन रात्रभर बेपत्ता
By Admin | Updated: November 18, 2015 02:09 IST2015-11-18T02:09:56+5:302015-11-18T02:09:56+5:30
येथील तहसील कार्यालयाचे शासकीय वाहन सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. सदर वाहन अचानक मंगळवारी दुपारी कार्यालयाच्या आवारात अवतरल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.

तहसील कार्यालयाचे वाहन रात्रभर बेपत्ता
तहसीलदारांकडून चौकशी सुरू : वाहन ओल्या पार्टीकरिता धाब्यावर उभे असल्याची चर्चा
रूपेश मस्के कारंजा (घाडगे)
येथील तहसील कार्यालयाचे शासकीय वाहन सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. सदर वाहन अचानक मंगळवारी दुपारी कार्यालयाच्या आवारात अवतरल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. हे वाहन नायब तहसीलदारांनी त्यांच्या मुलाला नोकरी लागल्याने दिलेल्या ओल्या पार्टीत सहभागी होण्याकरिता वापरल्याची चर्चा कार्यालयाच्या आवारात जोरात सुरू होती.
येथील तहसील कार्यालयाचे वाहन नायब तहसीलदार गणेश बर्वे स्वत:च्या मालकीचे असल्यागत वापरत असल्याचे बोलले जाते. यापूर्वी ‘लोकमत’ने या संबंधात वृत्त प्रकाशित केले होते. आता पुन्हा तसाच प्रकार घडल्याचे दिसते. तहसील कार्यालयाच्या आवारातून सदर शासकीय वाहन सोमवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास बेपत्ता झाले. सदर वाहन कुठे गेले अशी चर्चा सुरू असताना ते मंगळवारी दुपारी कार्यालयात अवतरले. या वाहनाचा वापर रात्री एका धाब्यावर झालेल्या ओल्या पार्टीकरिता झाल्याची माहिती आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारंजा तहसीलचा प्रभार सध्या आर्वीचे नायब तहसीलदार मिलिंद जोशी यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे उपविभागीय कार्यालय व कारंजा तहसीलचा कार्यभार असल्याने ते कुण्या एका कार्यालयात पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. याचाच लाभ उचलत नायब तहसीलदार गणेश बर्वे खासगी कामाकरिता वाहनाचा वापर करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. असाच प्रकार सोमवारी घडला. सदर वाहन कोंढाळी येथील धाब्यावर असल्याचे अनेकांनी पाहिले. असे असताना वाहन रात्री प्रभारी तहसीलदारांना आणण्याकरिता पाठविल्याचे बर्वे सांगत आहेत. सदर वाहन ओल्या पार्टीकरिता धाब्यावर आल्याची माहिती धाबा चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
तहसीलदार व नायब तहसीलदार आमने-सामने
शासकीय वाहन रात्रभर कार्यालयात नसल्याबाबत नायब तहसीलदार बर्वे यांना विचारले असता त्यांनी वाहन सोमवारी रात्री ७.३० वाजता आर्वी येथे तहसीलदार जोशी यांना आणण्याकरिता पाठविल्याचे सांगितले. तर जोशी यांनी बर्वे यांची माहिती खोटी असल्याचे म्हणत, मी कोणतेही वाहन मला आणण्याकरिता वा सोडण्याकरिता बोलाविले नसल्याचे सांगितले. यामुळे सदर वाहन प्रकरण नेमके काय वळण घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.