तलाठ्याची शेतकऱ्याला मारहाण
By Admin | Updated: May 13, 2015 01:50 IST2015-05-13T01:50:52+5:302015-05-13T01:50:52+5:30
आठ अ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तलाठ्याची तक्रार शेतकऱ्याने तहसीलदाराकडे केली.

तलाठ्याची शेतकऱ्याला मारहाण
झडशी : आठ अ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तलाठ्याची तक्रार शेतकऱ्याने तहसीलदाराकडे केली. याचा वचपा काढण्याकरिता सदर तलाठ्याने शेतकऱ्याला घरी बोलावून बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
मात्र या प्रकरणात तहसीलदाराने तलाठ्याला पाठीशी घालत शेतकरी प्रकाश सोमनाथे याच्याविरूद्ध पोलिसात तक्रार केल्याचा प्रकार घडला. सदर तलाठ्याचे नाव उमांकत टाले असे आहे. तक्रारीवरून पोलिसात शेतकऱ्यावर गुन्हा दाखल आहे.
या बाबत थोडक्यात वृत्त असे की, शेतकरी प्रकाश नारायण सोमनाथे यांना सर्व्हे नं. ४१, मौजा येंकापूर येथील त्यांच्या शेतीचा आठ अ पाहिजे होता. तो देण्यास तलाठी उमाकांत टाले टाळाटाळ करीत असल्याने त्यांनी याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे केली. यावरून संतापलेल्या टाले याने शेतकरी प्रकाश सोमनाथे याला घरी बोलावून मारहाण केली. शिवाय त्यांच्या गाडीची तोडफोड केली. यावेळी शेतकरी सोमनाथे यांच्यासोबत राजकुमार चंदनसे उपस्थित होते. यात सोमनाथे यांच्या हाताला जबर इजा झाली.
या सर्व प्रकारानंतर सदर तलाठ्याने शासकीय कर्मचारी असल्याचा आव आणत आपले काही सहकारी घेवून पोलिसात तक्रार दिली. तक्रारीत शेतकऱ्याविरूद्ध भादंवि ३२३, ५०४ नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.(वार्ताहर)