सावंगी (देरडा) परिसरात बिबट्याची धूम
By Admin | Updated: March 6, 2016 02:17 IST2016-03-06T02:17:49+5:302016-03-06T02:17:49+5:30
तालुक्यातील सावंगी (देरडा), धानोली, साकुर्ली परिसरात बिबट्याने एक महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे.

सावंगी (देरडा) परिसरात बिबट्याची धूम
वन विभागाने लावला पिंजरा : तरीही बिबट मोकाटच; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
समुद्रपूर : तालुक्यातील सावंगी (देरडा), धानोली, साकुर्ली परिसरात बिबट्याने एक महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने पिंजरा लावूनही बिबट्या त्यांना हुलकावणी देत असल्याचे दिसते.
बिबट्याचा सावंगी (देरडा) परिसरामध्ये एक महिन्यापासून खुला वावर होता. गावाच्या बाजुलाच नदी असल्यामुळे त्याचा परिसरामध्ये मुक्तपणे संचार सुरू आहे. सावंगी येथील विनोद डंभारे यांच्या गायीचे वासरू ओढत नेवून फस्त केले. याची तक्रार समुद्रपूर वनविभागाला दिली. ज्या ठिकाणी वासरू मारले होते, तिथे कॅमेराही लावला. सदर बिबट्या त्या ट्रॅपमध्ये कॅमेराबंद झाला. त्यानंतर बिबट्याने मंगेश टेकाम यांची बकरी ठार केली. सरपंच डंभारेसह गावकऱ्यांनी वनविभागाला पिंजऱ्याची मागणी केली तेव्हा वन विभागाने पिंजरा लावला. पिंजऱ्यामध्ये कुत्रा ठेवण्यात आला; मात्र बिबट्या त्या पिंजऱ्याकडे गेलाच नाही.
बिबट साकुर्लीकडे आढळल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे वनविभागाने सदर पिंजरा साकुर्लीकडे लावला. तिथेही बिबट आला नाही. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी दहशतीत असून ते शेतात सायंकाळी ५ वाजताच्या नंतर थांबत नाहीत. रात्रीला शेतात जाणे टाळतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)
बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार
आकोली : परिसरात सध्या बिबट्याने धुमाकूळ घालता आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शेतात बांधून असलेले जर्सी गायीचे एक वर्षाचे कालवड त्याने फस्त केले. शिकारीच्या वेळी बिबटासोबत सोबत बछडाही असल्याचे पायाच्या ठस्यावरून दिसत असल्याचे क्षेत्र सहायक राजू तुमडाम यांनी सांगितले.
दीपक काकडे यांचे शेत गावानजिक असून शेतात इतर गुरांसमवेत जर्सी गायीची कालवड बांधली होती. काल रात्रीच्या सुमारास या कालवडीवर बिबटाने हल्ला केला. यात कालवड ठार झाली. आज सकाळी काकडे यांचा मुलगा सचिन हा शेतात गेला असता सदर घटना उघडकीस आली. क्षेत्र सहायक राजू तुमडाम, वनरक्षक साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भोयर यांनी शवविच्छेदन केले. सदर कालवडीची किंमत २५ हजार रुपये होती, असे सांगण्यात आले.(वार्ताहर)