जलतरण हौद कालबाह्य सुविधांच्या गर्तेत

By Admin | Updated: May 17, 2015 02:26 IST2015-05-17T02:26:46+5:302015-05-17T02:26:46+5:30

२९ मे रोजी वर्धा नगर पालिकेच्या जलतरण हौदाला तब्बल २० वर्षे पूर्ण होत आहे.

Swimming sock out facilities | जलतरण हौद कालबाह्य सुविधांच्या गर्तेत

जलतरण हौद कालबाह्य सुविधांच्या गर्तेत

राजेश भोजेकर वर्धा
२९ मे रोजी वर्धा नगर पालिकेच्या जलतरण हौदाला तब्बल २० वर्षे पूर्ण होत आहे. कालमानानुसार येथील सुविधाही आता तोकड्या पडू लागल्या आहेत. वर्धेत हे एकमेव जलतरण हौद असल्यामुळे येथे जलतरणासाठी मोठी गर्दी असते. मात्र त्यामानाने येथे असलेल्या सुविधा अपुऱ्या पडत असल्यातरी याकडे लक्ष देण्यास ना पालिकेला ना स्थानिक लोकप्रतिनिधींचा सवड आहे.
येथे येणाऱ्या पुरुष व महिलांना या असुविधांचा सामना करावा लागत आहे. स्नानगृह २० वर्षांपूर्वीची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. महिलांसाठी केवळ पाचच स्नानगृह आहे, तर पुरुषांसाठी १० स्नान गृह याठिकाणी आहे. आताची संख्या लक्षात घेता ही सुविधा अपुरी पडत आहे. या हौदावर सकाळी आणि सायंकाळी महिलांची बॅच जलतरणासाठी येते. एका बॅचमध्ये शंभरावर महिला आहे. त्यांना पाच जणांच्या स्नानाची क्षमता असलेल्या स्नानगृहाचाच आधार घ्याला लागतो आहे. चक्क रांगेत उभे राहावे लागते. हीच अवस्था पुरुष स्नानगृहाची देखील आहे. येथे दररोज सकाळी पाच आणि सायंकाळी ३ बॅचेस आहे. दोन बॅचेच महिलांच्या वगळल्या तर तब्बल सहा बॅचेस पुरुषांच्या आहे. एका बॅचेसमध्ये सुमारे १५० पुरुष जलतरणासाठी येथे असतात. बॅचची वेळ संपताच येणारे आणि जाणारे असे ३०० जण एकाचवेळी या स्नानगृहात प्रवेश करीत असल्यामुळे अनेकांना ताटकळत राहावे लागते. ही या जलतरण हौदाची गंभीर समस्या आहे. जलतरण हौदाचा परिसर भव्य आहे. जलतरणासाठी येणाऱ्यांना हौदाच्या परिसरात बसण्यासाठी बेंचेसचा अभाव आहे. यामुळे आपली बॅच संपल्यानंतर वा प्रवेश केल्यानंतर येणाऱ्यांना उभे राहावे लागते. ही समस्यासुद्धा गंभीर रूप घेऊन आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, येथील जलशुद्धीकरण संयंत्र हे २० वर्षांपूर्वीचे आहे. ते आता कालबाह्य झालेले आहे. यामुळे हौदातील पाणी स्वच्छ करण्याची त्याची क्षमता कमी झालेली आहे. पाणी पूर्णत: स्वच्छ होत नसल्यामुळे जलतरण पटुंना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मात्र नगर पालिका प्रशासन उदासीन आहे. लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष देण्यास सवड नाही. उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्यामुळे जलतरणासाठी शालेय विद्यार्थ्यांचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनाही या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस येथे येणाऱ्यांची संख्या वाढीवर आहे. त्यामुळे हे हौद देखील आता अपुरे पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन या जलतरण हौदाचा विस्तार करण्याचीही गरज कालानुरुप झालेली आहे.
प्रशिक्षकाचे वेतनही तोकडे
जलतरण हौदावर पोहण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी शहरातील सुमारे २००० हजार पुरुष, महिला व मुले-मुली येथे येतात. त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम १२ प्रशिक्षकांवर आहे. इतकेच नव्हे, तर पाण्यात बुडू नये म्हणून त्यांना डोळ्यात तेल टाकून पहाराही द्यावा लागतो. ही मंडळी कंत्राटी पद्धतीने आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र त्यांना तुटपुंज्या वेतनावरच ही सेवा द्यावी लागत आहे. यातही त्यांना कंत्राटदाराकडून ४० टक्के आणि नगर पालिकेकडून ६० टक्के वेतन दिले जात आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकांचा जीव त्यांच्या हातात असतो. येथे अनुचित घटना घडली की थेट त्यांच्यावर रोष व्यक्त केला जातो. त्यांना पालिकेने नियमित केल्यास त्यांचीही चणचण दूर होईल आणि ते पुन्हा चोखपणे आपले कर्तव्य बजावू शकेल. सकाळी आणि सायंकाळी त्यांना येथे कर्तव्यावर येणे आवश्यक आहे. परिणामी त्यांना इतर व्यवसाय वा नोकरी करणे देखील सोईचे नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

Web Title: Swimming sock out facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.