घुई नदीवरील पूल धोक्याचा
By Admin | Updated: September 16, 2014 23:57 IST2014-09-16T23:57:23+5:302014-09-16T23:57:23+5:30
येथून खापरीकडे जात असलेल्या मार्गावरील घुई नदीवर असलेल्या पुलावर खोल खड्डे पडले असून सळाखी उघड्या पडल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. आजपर्यंत अपघातांत अनेक जण गंभीर झाले.

घुई नदीवरील पूल धोक्याचा
कोरा : येथून खापरीकडे जात असलेल्या मार्गावरील घुई नदीवर असलेल्या पुलावर खोल खड्डे पडले असून सळाखी उघड्या पडल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. आजपर्यंत अपघातांत अनेक जण गंभीर झाले. परिणामी, या धोकादायक पुलावरुन नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलाची उंची वाढवून डागडुजी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
जिल्ह्याच्या शेवटच्या नदीवर हा पूल असून चार किमी अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. घुई नदीचे पात्र लहान असले तरी दरवर्षी पावसाळ्यात नदीला मोठा पूर येत असल्यामुळे पुलावरून पाणी वाहते. परिणामी, पुलावर खोल खड्डे पडले असून सळाखी उघड्या पडल्या आहेत.
या मार्गाने शेगाव, भद्रावतीकडे जाणाऱ्या वाहनांची दिवसभर वर्दळ असते. या ठिकाणी अपघातांची मालिका सुरुच असते. आजपर्यंत अनेक जण गंभीर जखमी झाले. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरधाव वाहने खड्ड्यातून उसळून नदीच्या पात्रात पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावरील सळाखी उघड्या पडल्याने दुचाकीसह मोठी वाहने वारंवार पंक्चर होतात. या मार्गावर परिसरातील शेतकऱ्यांची शेती आहे.
पुलावरील खड्ड्यांमुळे व सळाखी उघड्या पडल्याने बैलांच्या पायांना दुखापत होते. अनेकदा भरधाव वाहने पुलावरील खड्ड्यांमध्ये फसत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांचा लांब रांगा लागतात. या पुलावर नेहमी अपघात होत असल्याने परिसरातील जनतेमध्ये रोष व्यक्त होत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुलाची उंची वाढवून डागडूजी करून होणारा त्रास थांबवावा अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)