जलतरण हौद सुविधांनी ‘अपडेट’ होणार
By Admin | Updated: May 21, 2015 02:02 IST2015-05-21T02:02:43+5:302015-05-21T02:02:43+5:30
‘जलतरण हौद असुविधांच्या गर्तेत’ या शिर्षकाखालील वृत्त ‘लोकमत’ने संडे स्पेशलमध्ये प्रकाशित केले होते.

जलतरण हौद सुविधांनी ‘अपडेट’ होणार
वर्धा : ‘जलतरण हौद असुविधांच्या गर्तेत’ या शिर्षकाखालील वृत्त ‘लोकमत’ने संडे स्पेशलमध्ये प्रकाशित केले होते. या वृत्तातून जलतरण पटूंच्या समस्यांना वाचा फोडली होती. या वृत्ताची दखल खुद्द खा. रामदास तडस यांनी घेतली असून येथील सुविधा ‘अपडेट’ करण्याचा विश्वास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
इतकेच नव्हे, तर जलतरण हौदाची संपूर्ण माहिती पालिकेला एका पत्राच्या माध्यमातून मागितली आहे. यामध्ये काय उपाययोजना करता येईल, याबाबतही पत्रातून विचारणा केली आहे. ही माहिती उपलब्ध होताच पुढील प्रक्रीयेला विनाविलंब सुरुवात करण्यात येणार असल्याचेही खा. तडस म्हणाले. जलतरण हौदाला तब्बल २० वर्षे पूर्ण होत आहे. कालामानानुसार येथील सुविधा तोकड्या पडू लागल्या आहे. वर्धेत हा एकमेव जलतरण हौद असल्यामुळे येथे पोहणे शिकण्यासाठी मोठी गर्दी असते. येणाऱ्या जलतरणपटुंना या असुविधांचा सामना करावा लागत आहे. हौदावर सकाळी व सायंकाळी महिलांची बॅच जलतरणासाठी येते.. एक बॅचमध्ये शंभरावर महिला आहे. त्यांना पाच जणांच्या स्नानाची क्षमता असलेल्या स्नानगृहाचाच आधार घ्याला लागत असून अनेकदा चक्क रांगेत उभे राहावे लागते.
हीच अवस्था पुरुष स्नानगृहाची देखील आहे. जलशुद्धीकरण संयंत्र कालबाह्य झाले असून आवारभिंतीलाही तडा गेल्या आहे. प्रशिक्षकांना तोकड्या वेतनावर कर्तव्य पार पाडावे लागत आहे, या गंभीर समस्यांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता.(जिल्हा प्रतिनिधी)