मिठाईसाठी पेढा, खवा मध्य प्रदेशातून
By Admin | Updated: November 26, 2015 01:59 IST2015-11-26T01:59:18+5:302015-11-26T01:59:18+5:30
सणांच्या काळात प्रत्येक घरी मिठाईची रेलचेल असते. गत काही वर्षांत एका विशिष्ट मिठाईने प्रत्येकाच्या मनाला भूरळ घातली आहे;

मिठाईसाठी पेढा, खवा मध्य प्रदेशातून
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर : स्वीट मार्ट चालकांचा प्रताप
रूपेश मस्के कारंजा (घा.)
सणांच्या काळात प्रत्येक घरी मिठाईची रेलचेल असते. गत काही वर्षांत एका विशिष्ट मिठाईने प्रत्येकाच्या मनाला भूरळ घातली आहे; पण या ‘स्वीट मार्ट’ चालकांनी निकृष्ट पदार्थांपासून बनविलेली मिठाई आरोग्यास धोकादायक ठरत आहे. येथील एका स्वीट मार्टमध्ये मध्यप्रदेशातून आलेल्या पेढा, खव्याने ही बाब उघड झाली आहे. यामुळे अन्न, औषधी प्रशासन विभागाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही ‘स्वीट मार्ट’ने आपल्या पदार्थांनी नागरिकांना भूरळ घातली आहे. स्वीट मार्टमध्ये बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची चव जिभेला स्वाद देणारी असली तरी यात वापरण्यात येणारे साहित्य कसे आहे, हे त्यांनाच माहिती असते. त्या स्वीट मार्टमध्ये मिळणारे खाद्य पदार्थ हे चांगल्या चवीचे, शुद्ध तेलापाूसन बनविलेले उत्तम दर्जाचे असल्याचे सांगितले जाते. यामुळेच सेव, पापडी, पेढा, बर्फी आदी पदार्थ नागरिक सदर स्वीट मार्टमधून खरेदी करतात; पण केवळ विशिष्ट स्वीट मार्टच्या नावावर निकृष्ट पेढा, खव्यापासून तयार केलेल्या बर्फीचे पदार्थ विकले जात असल्याचे उघडकीस आले आहे. सदर पदार्थ तयार करण्यासाठी मध्यप्रदेश येथून निकृष्ट पेढा व खवा बोलविला जातो.
सदर पदार्थांच्या पोत्यांवर ‘एक्सपायरी डेट’ नमूद नसते. पेढा, खव्याचे हे पोते मध्यप्रदेशातून कधी गॅरेजने तर कधी स्वत: स्वीट मार्ट चालक पायदळी तुडवित घेऊन येतात. असे एक पोते कारंजा येथील एका स्वीट मार्टमध्ये आणले. प्रस्तूत प्रतिनिधीने याबाबत विचारणा केली असता, हा माल हा बाहेरून आल्याचे व यात तयार पेढा असल्याचे दुकानदारानेच सांगितले. यापासून आम्ही पदार्थ बनवितो, असेही तो म्हणाला. एवढेच नव्हे तर येथे अन्य पदार्थही निकृष्ट दर्जाच्या बेसनापासून बनविले जातात.
या स्वीट मार्टमधून खव्यापासून बनविलेल्या बर्फ्या, पेढा नागरिक डोळे मिटून घेतात; पण उत्कृष्ठ चवीच्या नावावर निकृष्ट पदार्थ नागरिकांना विकले जात आहेत. खाद्य पदार्थ विकणाऱ्या या स्वीट मार्ट, हॉटेल आदींची तपासणी करण्याचे काम अन्न व औषधी प्रशासनाने करणे गरजेचे असते; पण हा निद्रीस्त विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसतो.