स्वामी विवेकानंद उच्च कोटीतील दर्शनिक होते
By Admin | Updated: October 11, 2016 02:32 IST2016-10-11T02:32:33+5:302016-10-11T02:32:33+5:30
स्वामी विवेकानंदांना हिंदुत्ववादी विचार सरणीतील लोकांनी हिंदुत्ववादी सन्यासी करून विवेकवादी, समतावादी,

स्वामी विवेकानंद उच्च कोटीतील दर्शनिक होते
दत्तप्रसाद दाभोळकर : १९ व्या शतकातील विवेकानंद विषयावर व्याख्यान
वर्धा : स्वामी विवेकानंदांना हिंदुत्ववादी विचार सरणीतील लोकांनी हिंदुत्ववादी सन्यासी करून विवेकवादी, समतावादी, समाजवादी, धर्मनिरपेक्षता याबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन समाजातून पूर्णपणे हद्दपार करून त्यांना भगवेवस्त्र धारण करणारा सन्यासी बनविले; पण विवेकानंद भारतातील जातीव्यवस्था, कर्मकांड, गरीबी, महिलांची दुरवस्था, शेतकरी मजूर यांची हलाखीची स्थिती याला जबाबदार पुरोहित व ब्राह्मणशाही व्यवस्था या सर्वांवर सडेतोड विचार व्यक्त करीत होते. ते खऱ्या अर्थाने उच्च कोटीतील दर्शनिक होते, असे मत ‘शोध स्वामी विवेकानंदाचा’ पुस्तकाचे लेखक, शास्त्रज्ञ, ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखा, अनेकांत स्वाध्याय मंदिर, राष्ट्र सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने व निर्माण फाऊंडेशन आणि नई तालिम संघ सेवाग्राम यांच्या सहकार्याने डॉ. नरेंद्र दाभोळकर विचार व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे आयोजन अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात करण्यात आले. यावेळी ‘१९ व्या शतकालीत विवेकानंद’ विषयावर डॉ. दाभोळकर शोध विवेकानंदांचा या त्यांच्या ग्रंथरूपात लिहलेल्या पुस्तकाच्या संदर्भाने मार्गदर्शन करीत होते.
मंचावर अनेकांत स्वाध्याय मंदिरचे अध्यक्ष डॉ. महावीर पाटणी, सचिव अरुण चवडे, गांधीवादी कार्यकर्ते रवींद्र रूख्मिणी पंढरीनाथ, महाराष्ट्र अनिसचे सचिव डॉ. सिद्धार्थ बुटले उपस्थित होते.
पूढे बोलताना डॉ. दाभोळकर यांनी तारखेसह अनेक दाखले देऊन विवेकानंद २ नोव्हेंबर १८९३ ला आपल्या पत्रात म्हणतात, धर्मवेडा सारखा मनाला होणार दुसरा भयावह रोग नाही. मी धर्माचे वेड पांघरलेला एक विचारवंत आहे. ३ मार्च १८९४ च्या पत्रात ते म्हणतात, सामाजिक नियमांचा कर्ता होण्याचा धर्माला काही अधिकार नाही. यावरून विवेकानंद समाजवादी आहे. परिवर्तन व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अग्रदूत आहे. फक्त सुशिक्षित हिंदुमध्ये आढळून येणाऱ्या धर्मभोळ्या, निर्दय, दांभिक, नास्तिक, भेकडामधील एक बनून मी जगावे, यासाठी जन्माला आलो नाही. शुद्रांची, कामगारांची, आर्थिक स्थिती सुधारेल, त्यांचा दर्जा सुधारेल, शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होईल, असे ही स्वामी विवेकानंद म्हणतात. बेलूर मठात १८९८ ला विवेकानंद म्हणतात, जे धर्मगुरू आज सत्वगुणी म्हणून मिरवताहेत, त्यातील ९० टक्के खरेतर तमोगुणी आहे. आता आपण या देशातील लोकांना मांस, मासे खाऊन कार्यप्रवण करण्याची गरज आहे. पूढे कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवू नको, वेद थापाडे आहेत, असे देवीवणी मासिकातून विचार सांगतात, हे दाखल्यांनी पटवून दिले.
संचालन डॉ. धनंजय सोनटक्के यांनी केले तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयूर डफळे, विजय कडू, भीमसेन गोटे, गजेंद्र सुरकार, भरत कोकावार, सुनील ढाले, सारिका डेहनकर, अमिर अजानी यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
४१० जून १८९८ ला मोहम्मद सर्फराज हुसेन यांना पाठविलेल्या पत्रात विवेकानंदांनी आपल्याला नवा धर्म, नवा देव आणि नवा वेद हवा आहे. कारण, आपल्याला नवा भारत घडवायचा आहे, असे स्वामी विवेकानंदांनी नमूद केले होते. यावरही दाखले देत खरा विवेकानंद डॉ. दाभोळकर यांनी समजावून सांगितला.