पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्यांना स्थगिती
By Admin | Updated: July 25, 2014 00:00 IST2014-07-25T00:00:06+5:302014-07-25T00:00:06+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळांतील ६०३ मंजूर पदवीधर पदांकरिता ४५० पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण

पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्यांना स्थगिती
वर्धा : शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळांतील ६०३ मंजूर पदवीधर पदांकरिता ४५० पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वादंग उठत होते़ यावर अनेक शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला. अशातच शिक्षणाधिकाऱ्यांनी या नियुक्त्यांना स्थगिती देण्याचे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. नियुक्त्या रद्द करण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या पत्रात अपरिहार्य कारणामुळे, असा उल्लेख आहे.
जिल्हा परिषदेच्या पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या करताना सेवाज्येष्ठता डावलल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला. याचे निवेदन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. या नियुक्त्या झाल्या त्या काळापासून शिक्षण विभागात गोंधळ सुरू होता. यापूर्वी उच्च श्रेणी मुख्याध्यापकाच्या पदावनती विरोधात मुख्याध्यापक न्यायालयात गेले होते. त्यावर निर्णय देत मुख्यध्यापकांना त्यांच्या जागेवर तसेच ठेवण्याचा निर्णय देण्यात आला. यात आता पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या अडचणीत आल्या आहेत. या नियुक्त्या करताना निकष डावलल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर जिल्हा परिषदेत वाद सुरू असताना मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी एक पत्र काढत या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आल्याचे प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे. हे पत्र येताच सर्वत्र गोंधळ माजला. या नियुक्त्या का रद्द झाल्यात, याचे कारण मात्र जाहीर करण्यात आले नाही़ या पत्रात नियुक्त्या रद्द करण्याचे कारण अपरिहार्य, असे दाखविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)