वन कोठडीत आरोपींची चुप्पी

By Admin | Updated: November 1, 2014 23:11 IST2014-11-01T23:11:58+5:302014-11-01T23:11:58+5:30

शहर पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने बुधवारी (दि़२९) कासवाच्या माध्यमातून गुप्तधन शोधून देणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले़ सदर प्रकरण वन विभागाकडे हस्तांतरित केल्यानंतर न्यायालयाने पाचही

Suspension of accused in forest cover | वन कोठडीत आरोपींची चुप्पी

वन कोठडीत आरोपींची चुप्पी

तपासाची गती कासवासम : गुप्तधन शोधणारी टोळी अटक प्रकरण
प्रशांत हेलोंडे - वर्धा
शहर पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने बुधवारी (दि़२९) कासवाच्या माध्यमातून गुप्तधन शोधून देणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले़ सदर प्रकरण वन विभागाकडे हस्तांतरित केल्यानंतर न्यायालयाने पाचही आरोपींना २ नोव्हेंबरपर्यंत वन कोठडी दिली; पण या तीन दिवसांच्या कोठडीतही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आरोपींना बोलते करता आले नाही़ शिवाय तपासाची गती कासवाच्या गतीपेक्षाही मंद असल्याने प्रकरण सेटींगच्या वळणावर तर नाही ना, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे़
गुप्तधन शोधणारी टोळी विदर्भात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सिमेवर सक्रीय आहे़ या टोळीमार्फत विविध प्रकाराने गुप्त धन शोधून देण्याचे दावे केले जातात़ यामुळे नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकतात़ या टोळीद्वारे कजली करणे, पायाळू माणसामार्फत शोध घेणे, बळी देणे, पांढरे घुबड वा २०-२१ नखे असलेल्या कासवांच्या माध्यमातून गुप्तधन शोधण्याचे दावे केले जातात़ यासाठी सदर टोळीतील इसम पांढरे घुबड, कासव, पायाळू व्यक्तीही सोबत बाळगत असल्याचे सांगितले जाते़
अशाच एका टोळीला बुधवारी वर्धा पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून तीन कासव जप्त करण्यात आल्याने प्रकरण वन विभागाला वर्ग करण्यात आले़ यात आरोपी शंकर सावरकर रा. खापरी, उमेश बुराडे रा. खापरी, किसना बाळपांडे रा. कोंढाळी, सचिन सोनटक्के रा़ काटोल व गजानन साटोणे दोन्ही रा. काटोल या पाच आरोपींना वन विभागाने न्यायालयात हजर केले़ चौकशीसाठी कोठडीची मागणी केल्याने तीन दिवसांची वन कोठडी देण्यात आली़ या तीन दिवसांत आरोपींकडून बरीच माहिती मिळविणे शक्य होते़ शिवाय पाचही आरोपी मुरब्बी असल्याने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यताही वर्तविली जात होती; पण वन विभागाला तीन दिवसांत काहीही हाती लागले नाही़ वन विभागातील अधिकाऱ्यांना शुक्रवारी भ्रमणध्वनीवर विचारणा केली असता आम्ही लिलावात व्यस्त असल्याने तपासच करता आला नाही, असे उत्तर देण्यात आले़
प्रकरण गंभीर असताना वन विभागाचे अधिकारी तपासात काहीच निष्पन्न झाले नाही, असे सांगत आहेत़ यामुळे प्रकरण दडपले जाण्याची शंका व्यक्त होत आहे़

Web Title: Suspension of accused in forest cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.