विद्यार्थिनींशी गैरवर्तनप्रकरणी मुख्याध्यापक निलंबित
By Admin | Updated: February 7, 2016 00:21 IST2016-02-07T00:21:49+5:302016-02-07T00:21:49+5:30
विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तालुक्यातील सुलतानपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

विद्यार्थिनींशी गैरवर्तनप्रकरणी मुख्याध्यापक निलंबित
हिंगणघाट पं.स.तील सुलतानपूर येथील घटना
हिंगणघाट : विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तालुक्यातील सुलतानपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या शिक्षकाचे नाव चंद्रभान झाडे असे असल्याचे सांगण्यात आले आहे.
तालुक्यातील सावली (वाघ) गटातील सुलतानपूरच्या गावकऱ्यांनी तेथील जि. प. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक चंद्रभान झाडे विरोधात हिंगणघाट पंचायत समिंतीमध्ये निवेदन दाखल केले. या निवेदनानुसार चंद्रभान झाडे यांचा विद्यार्थ्यांना त्रास असून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच कारवाई न झाल्यास मंगळवारी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता.
गावकर्ऱ्यांच्या निवेदनावरून हिंगणघाट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ललितकुमार बारसागडे व केंद्र प्रमुख मेश्राम यांनी सुलतानपूर येथे भेट दिली. शाळेचे कुलूप काढून विद्यार्थी व पाकलवर्गाला शाळेत बसवून त्यांनी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार त्यांच्यासमोर आला. विद्यार्थिनींनी आपल्या लेखी बयाणात चंद्रभान झाडे हा आमच्या सोबत गैरवर्तणूक करतो तसेच सतत स्पर्श करीत असल्याचे नमूद केले.
विद्यार्थिनींचे आरोप ऐकून दोनही अधिकारी अवाक झाले. हा प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास येताच विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल पंचायत समितीत दाखल केला. यात त्यांनी चंद्रभान झाडे यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली. हा अहवाल गट विकास अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक शिक्षणाधिकारी तेलंग यांच्याकडे पाठविला.
या अहवालावरुन चंद्रभान झाडे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याचे अहवालावरून दिसून येते. त्यांनी महाराष्ट्र जि. प. (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याने स्पष्ट होत असल्याने जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३ अन्वये त्यांना तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांनी निर्गत केला. चौकशी अधिकारी बारसागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ विद्यार्थिनींनी सदर शिक्षकाच्या विरोधात बयाण दिल्याचे सांगितले. या सगळ्या पहिली ते चवथ्या वर्गात शिकणाऱ्या मुली आहेत. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.(तालुका प्रतिनिधी)