अपहरण प्रकरणातील आरोपी अटकेत
By Admin | Updated: September 3, 2014 23:37 IST2014-09-03T23:37:24+5:302014-09-03T23:37:24+5:30
एका सहावर्षीय चिमुकलीवरील अमानवी अत्याचार. त्यानंतर एका तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न या घटना ताज्या असताना सोमवारी पुन्हा एका १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला.

अपहरण प्रकरणातील आरोपी अटकेत
आरोपीच्या पत्नीमुळे अनर्थ टळला : तो निघाला जि.प.शाळेचा शिक्षक
वर्धा : एका सहावर्षीय चिमुकलीवरील अमानवी अत्याचार. त्यानंतर एका तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न या घटना ताज्या असताना सोमवारी पुन्हा एका १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. या घटनेनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. या प्रकरणातील पसार झालेला आरोपी नरेंद्र अंबादास वसू याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरुन नरेंद्र अंबादास वसू रा. अग्रगामी इंग्लिश स्कूलसमोर वर्धा याच्याविरुद्ध कलम ३६३, ३६६, ३४१, ५०६ आणि लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र घटनेनंतर तो पसार झाला. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे शहर पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. आरोपी हा कारंजा तालुक्यातील सिंदीविहिरी येथील जि.प. शाळेत शिक्षक असल्याचेही पोलीस सूत्राने सांगितले.
पोलीस सूत्रानुसार, इयत्ता ११ वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी सकाळी १० वाजताच्या सुमारास शाळेत जात होती. दरम्यान, शहरातील आरती चौकातील एका पेट्रोलपंप समोर नरेंद्र वसू हा इसम दुचाकीने तेथे आला. त्याने तिला आपल्या वाहनावर बसायला सांगितले. त्या मुलीने त्याला विरोध केला असता त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिला आपल्या राहत्या घरी नेले. तिथे त्याची पत्नी अंगणात होती.
तिला संशय येताच ही मुलगी कोण असा सवाल पती नरेंद्रला केला. तेव्हा ती नातेवाईक असून स्वत:हून सोबत आल्याचे सांगितले. मात्र ती मुलगी रडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने आस्थेने विचारपूस केली असता तिने आपबिती सांगितली.
त्या महिलेने तिच्याकडून तिच्या आईचा भ्रमणध्वनी घेऊन या घटनेबाबत अवगत केल्याने घटना उघडकीस आली. पीडिताच्या आईने मुलीला घेऊन वर्धा शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. त्या आरोपीच्या पत्नीने समयसुचकता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर आरोपी पसार झाला होता अधिक तपास पोलीस करीत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)