प्रस्तावित उड्डाण पुलांच्या जागेची पाहणी

By Admin | Updated: September 26, 2015 02:07 IST2015-09-26T02:07:44+5:302015-09-26T02:07:44+5:30

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या तीन रेल्वे उड्डाण पुलांच्या कार्याना गती देण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने खा. रामदास तडस यांच्यासह संबंधित...

Supervision of the proposed flyovers | प्रस्तावित उड्डाण पुलांच्या जागेची पाहणी

प्रस्तावित उड्डाण पुलांच्या जागेची पाहणी

रामदास तडस : चमूकडून पुलगाव, वर्धा व सिंदी(रेल्वे) येथे आढावा
वर्धा : जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या तीन रेल्वे उड्डाण पुलांच्या कार्याना गती देण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने खा. रामदास तडस यांच्यासह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रत्यक्ष भेट देवून जागेची पाहणी केली. यामुळे रेल्वे उड्डाण पुलाअभावी डोकेदुखी ठरलेल्या समस्यांचा मार्ग मोकळा होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
सकाळी सुरू झालेला हा पाहणी दौरा सायंकाळपर्यंत करण्यात आला. दरम्यान, पुलगाव रेल्वे उड्डाण पूल, वर्धा शहरातील बजाज चौकात रेल्वे उड्डाण पुलाचे विस्तारीकरण, सिंदी रेल्वे येथील प्रस्तावित उड्डाण पूल तसेच हिंगणघाट येथील प्रगतिपथावर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
या चमूने त्यांची पाहणी पुलगाव येथून सुरू केली. त्यानंतर वर्धा व नंतर सिंदी (रेल्वे ) मार्गे जात हिंगणघाट येथील पुलाची पाहणी केली. सिंदी (रेल्वे) नगर परिषद सभागृहात नगराध्यक्ष, न.प. उपाध्यक्ष, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, आर्वीचे जुमडे, उपअभियंता बोरकर, टाके, कुटे, चव्हाण, शाखा अभियंता मिसाळ, मून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेल्वे उड्डाण पुलाचे कन्सलटंट मोटघरे, रेल्वे विभागाचे अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काळे, पिंपळे हे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.(जिल्हा प्रतिनिधी)
पुलगावात ४५ कोटींच्या पुलाला मान्यता
पुलगाव येथे ४५ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. मात्र भूसंपादन निगडीत काही कामे प्रलंबित असल्याने सदर कामाला विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भूसंपादन अधिकारी शिरीष पांडे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्वरित बैठक आयोजित करून योग्य तोडगा काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे उड्डाण पुलाच्या नियोजित जागेची पाहणी खा. तडस यांनी केली.
वर्धेच्या पुलाचा मार्ग मोकळा
जिल्ह्यातील नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने अति महत्त्वाचा पण अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बजाज चौकातील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या विस्तारिकरणासाठीच्या नियोजित जागेची पाहणी केली. या पुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयांतर्गत केंद्रीय मार्ग निधी योजनेतून ४५ कोटी रूपयांची मान्यता मिळालेली आहे. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती यावेळी खा. तडस यांनी दिली.
सिंदीत प्रस्तावित जागेची पाहणी
सिंदी (रेल्वे) येथे प्रस्तावित उड्डाणपुलाच्या नियोजित जागेची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी सर्व बाबींची पूर्तता करूनसुद्धा मुंबई येथे तांत्रिक रेल्वे विभागाकडून अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी खा. तडस यांनी लगेच मुंबई येथील मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सुद यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून प्रकरण लवकर मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या.
राष्ट्रीय महामार्गा क्र. ७ वर हिंगणघाट शहरानजीक प्रगतिपथावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलांच्या कामाला विलंब होत असल्याकारणाने अनेक नागरिकांना तासन्तास रेल्वे गेटवर ताटकळत प्रतीक्षा करावी लागते. परिणामी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागून वाहतूक नेहमीच विस्कळीत होते. तसेच त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्याबाबत अनेकांकडून वेळोवेळी तक्रारी प्राप्त झाल्याने खासदारांनी प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. कामाला गती देण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तेथील शासकीय विश्रामृहात नगराध्यक्ष पंढरी कापसे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, नगर परिषद सदस्य व अनेक मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीदरम्यान सदर काम ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Supervision of the proposed flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.