समता सागर महाराज : मुनीदीक्षा दिवस समारंभपुलगाव : भारतीय संस्कृतीमधील राजस्थानच्या मरूभूमीत उदयास आलेले आचार्य विद्यासागर महाराज यांनी जैन परंपरेस सत्व अहिंसा या तत्वाचा प्रचार करणाऱ्या ४०८ मुनींना धर्मदीक्षा देवून गुरू-शिष्याची तसेच गुरूकुल आचार्यांची परंपरा अधिक समृद्ध केली. त्याच्या कार्याची महिमा सागराची अथांगता दाखविणारी व हिमालयाची उंची गाठणारी असल्याने ते या शतकाचे महानायक ठरले, असे मौलिक विचार मुनीश्री समता सागर महाराज यांनी पुलगाव येथे आचार्य विद्यासागर महाराज यांनी पुलगाव येथे आचार्य विद्यासागर महाराजांच्या ४७ व्या मुनीदीक्षा दिवस समारंभात बोलताना व्यक्त केले.या समारंभानिमित्त शहरातील सकल जैन समाजाच्यावतीने सकाळी खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरातून शांतीधारा अभिषेक झाल्यानंतर विशाल शोभेयात्रेचे आयोजन करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान आचार्यांची प्रतिमा ट्रॉलीवर वर्धा येथील संगीत भजनी मंडळ, १०१ कलशेधारी पिवळ्या वस्त्रातील सुहासिनी व श्वैतवस्त्रधारी जैन श्रावक, सुमधूर बँड इत्यादी वैशिष्ट्यांनी निघालेल्या या शोभायात्रेचे मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. आचार्य विद्यासागर मुनी संघातील मुनीश्री समता सागर, मुनीश्री अरहसागर, ऐलक निश्चय सागर या महाराजांचा सहभाग हे या शोभायात्रेचे वैशिष्ट होते. शोभायात्रा नाचणगाव मार्गे फिरून कन्हैया मंगलम येथे आल्यानंतर जीनवाणी व गुरूचरित्र पूजन करण्यात आले.त्यानंतर संगीतमय शांती विधानपूजा करण्यात आली. वर्धा येथील राजेश भुसारी व पद्मावती माता संगीत संचाच्या नियोजनात संपन्न झालेल्या या पुजेचे पौरोहित्य पं. आदेश कुमार जैन कारंजा (लाड) यांनी केले. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, कारंजा, चांदूर व नाचणगावच्या सर्वच जैन समाज बांधवांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमात आहारचर्या सामाजिक मंगलाचरण होवून मुनीश्रीचे पदापक्षालन व शास्त्र भेट इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.या प्रसंगी भारतीय जैन संघटना व दिगंबर महासमितीच्यावतीने १० वी च्या शालांत परीक्षेत शहरातून मुलीमध्ये प्रथम आलेल्या अनुजा किशोर चानेकर व मुलामध्ये प्रथम आलेल्या अनुज रविंद्र हनमंते या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात आला. समितीचे अध्यक्ष सुभाष झांझरी याचे सहकार्य व मार्गदर्शनात मुनीसंघाच्या प्रवचनानंतर ४७ दीप लावून महाआरती करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)
आचार्य विद्यासागर महाराज शतकाचे महानायक
By admin | Updated: July 3, 2014 23:44 IST