वर्धेतील सायकलपटूंनी मिळविला ‘सुपर रेन्डोनर’ खिताब
By Admin | Updated: October 21, 2016 02:03 IST2016-10-21T02:03:34+5:302016-10-21T02:03:34+5:30
साहसी खेळाकडे लोकांचा कल वाढला आहे. गतवर्षी ‘लोकमत’ने ‘नो व्हेईकल डे’ ची सुरुवात केली.

वर्धेतील सायकलपटूंनी मिळविला ‘सुपर रेन्डोनर’ खिताब
महिनाभरात २०० ते ६०० किमी सायकल भ्रमंतीचा गाठला टप्पा
वर्धा : साहसी खेळाकडे लोकांचा कल वाढला आहे. गतवर्षी ‘लोकमत’ने ‘नो व्हेईकल डे’ ची सुरुवात केली. या उपक्रमाला वैद्यकीय जनजागृती मंचसह बहार नेचर, जनहीत मंच व वर्धा सायकल क्लबने प्रतिसाद दिला. यातीलच सायकल पटुंनी आॅडक्स क्लबतर्फे दिला जाणारा ‘सुपर नेन्डोनर’ हा खिताब मिळविला. यासाठी त्यांनी ११ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबर दरम्यान २०० ते ६०० किमीपर्यंतचे सायकल भ्रमंतीचे टप्पे पूर्ण केले.
डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. नितीन मेशकर, डॉ. नितीन भलमे, डॉ. अभिजीत खनके, डॉ. वैभव पाटणी, संजय दुरतकर, अंकीत जैस्वाल व डॉ. अश्विन कलंत्री यांनी ‘ब्रव्हहार्ट पॅडलर क्लब’ नावाने उपक्रम सुरू केला. पहिली ४० किमीची खुली सायकल रॅली घेतली. यात सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला. ब्रेव्हहार्ट क्लबच्या सदस्यांनी ‘आॅडॅक्स क्लब फ्रांस’च्या ‘बेवेट’ सायकल रॅलीत सहभाग घेतला. सर्वप्रथम क्लबचे दुरतकर व डॉ. कलंत्री यांनी २०० किमीची रॅली पूर्ण केली. यानंतर दुसऱ्या २०० किमीच्या आयोजनात डॉ. सातपुते, डॉ. मेशकर, डॉ. खणके, डॉ. भलमे, डॉ. पाटणी, जैस्वाल व दुरतकर यांनी सफल सहभाग नोंदविला. दरम्यान, डॉ. कलंत्री यांनी ३०० किमीची रॅली पूर्ण केली. आॅडॅक्स क्लबतर्फे सुपर रेन्डोनर हा खिताब मिळविण्यासाठी एका कॅलेंडर वर्षात (नोव्हेंबर ते आॅक्टोबर) २००, ३००, ४०० व ६०० किमीची रॅली दिलेल्या वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असते. याप्रमाणे दुरतकर व डॉ. भलमे यांनी ३०० किमी रॅली पूर्ण केली. डॉ. कलंत्री, दुरतकर, डॉ. भलमे व जैस्वाल यांनी ४०० किमी रॅली पूर्ण केली. १५ व १६ आॅक्टोबरला ६०० किमी रॅली पूर्ण करून सुपर रेन्डोनर हा खिताब मिळविला. शिवाय प्रा. वानखेडे व डॉ. कलंत्री यांनी २०० किमीची रॅली पूर्ण केली. सायकल पटुंचा वैद्यकीय जनजागृती मंचने बुधवारी गौरव केला.(कार्यालय प्रतिनिधी)