सणाच्या दिवसांत स्वस्त धान्य दुकानातून साखर बेपत्ता
By Admin | Updated: November 2, 2016 00:37 IST2016-11-02T00:37:39+5:302016-11-02T00:37:39+5:30
दिवाळीनिमित्त प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ तयार केले जातात. समाजातील दुर्बल घटकांचीही दिवाळी चांगली व्हावी

सणाच्या दिवसांत स्वस्त धान्य दुकानातून साखर बेपत्ता
गरजवंतांची भटकंती : काळ्या बाजाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
वर्धा : दिवाळीनिमित्त प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ तयार केले जातात. समाजातील दुर्बल घटकांचीही दिवाळी चांगली व्हावी म्हणून शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत साखरेचा वेळीच पुरवठा करण्यात आला; पण प्राप्त झालेली साखर अनेक गरजवंतांना मिळाली नसल्याची ओरड होत असल्याने दिवाळीच्या दिवसांमध्ये शासकीय धान्यासह साखरेचा काळाबाजार करणारी टोळी सक्रीय असल्याचे समोर येत आहे.
जिल्ह्यातील ८३८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या गरजुंंना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात धान्यसाठा व साखर दिली जाते. गत १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यासाठी १० हजार ९०१ क्विंटल साखर साठा प्राप्त झाला. दिवाळीच्या पूर्वी प्राप्त झालेला धान्य व साखर साठा स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचविण्यात आला; पण गरिबांच्या वाट्याची साखर अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी गरजुंना वाटप न करताच ती चढ्या भावात व्यापाऱ्यांना विकल्याची ओरड होत आहे.
दिवाळीच्या पूर्वी मिळणारी साखरच दुर्बल घटकांना मिळाली नसल्याने त्यांना सणाच्या दिवसांत गोड पदार्थांपासून मुकावे लागले. यामुळे जिल्ह्यात होत असलेला साखरेचा काळा बाजार थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.(शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात ९२ हजार लाभार्थी
दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रती महिना स्वस्त धान्य दुकानातून ५०० ग्रॅम साखर दिली जाते. स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात साखर प्राप्त करणाऱ्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील ४७ हजार ५७४ तर अंत्योदय योजनेच्या ४४,२४० लाभार्थ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्याला १,०२५ क्विंटल साखर प्राप्त
यंदा जानेवारी महिन्यात जिल्ह्याला १०२५ क्विंटल साखर प्राप्त झाली असून ती स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचविण्यात आली. फेब्रुवारीत १०२५ क्विंटल साखर उपलब्ध होती. त्यापैकी १०२४.८५ क्विंटल साखरेची उचल करून वाटप करण्यात आली. मार्च, एप्रिल व मे महिन्यात प्रती महिना १०२५ क्विंटल साखर प्राप्त झाली व ती वाटप करण्यात आली. जून महिन्यात १०२५ पैकी १०२४.९२ क्विंटल साखरेची उचल करून वाटप करण्यात आली. जुलै महिन्यात १०२५ पैकी १०२४ क्विंटल, आॅगस्ट महिन्यात १०२५ पैकी १०२४.३१ क्विंटल साखरेची उचल करून वाटप करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात १३५३ क्विंटल साखरचे वितरण करण्यात आले. आॅक्टोबर महिन्यात १३५१.७०४ क्विंटल साखर प्राप्त झाली असून त्याचा वाटप झाल्याचे सांगण्यात आले आहे.