कारवाईचा बडगा उगारताच आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: January 14, 2016 02:47 IST2016-01-14T02:47:17+5:302016-01-14T02:47:17+5:30
भावाने दिलेल्या तक्रारीची दखल घेत देवळी पोलीस अटकेच्या कारवाईसाठी आरोपीच्या घरी गेले.

कारवाईचा बडगा उगारताच आत्महत्येचा प्रयत्न
चिखली येथील घटना : आरोपी उपचारार्थ सामान्य रुग्णालयात
देवळी : भावाने दिलेल्या तक्रारीची दखल घेत देवळी पोलीस अटकेच्या कारवाईसाठी आरोपीच्या घरी गेले. दरम्यान, कारवाईच्या धास्तीने आरोपीने विषारी औषध प्राशन केले. पोलिसांसमोरच ही घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. आरोपीला उपचारार्थ वर्धा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना चिखली येथे बुधवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास घडली.
पोलीस सुत्रानुसार, घटनेतील आरोपी पांडुरंग नारायण ठाकरे याच्या विरूद्ध त्याचा भाऊ विजय नारायण ठाकरे यांनी देवळी पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपी हा नेहमी अश्लील शिवीगाळ करतो. हातात कुऱ्हाड घेऊन गावात दहशत निर्माण करतो. शिवाय विष देऊन कोंबड्या मारल्याचे विजय ठाकरे याने तक्रारीत नमूद केले होते. यावरून देवळी पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. अटकेच्या कारवाईसाठी देवळी पोलीस त्याच्या चिखली येथील राहत्या घरी दाखल झाले. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच आरोपीने स्वत:चे घरात जाऊन उंदीर मारण्याचे विषारी औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सहकार्याने आरोपीला उपचारासाठी वर्धा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गावात गोंधळ उडाला होता.(प्रतिनिधी)