सुदामपुरी ‘कंटेन्मेंट झोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:49+5:30
सुदामपूरी येथील रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय व्यक्तीला यकृताच्या आजारामुळे १७ मे रोजी तेलगणामधील सिकंदराबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिकंदराबाद येथील रुग्णालयात सात दिवस उपचार घेतल्यानंतर ते वर्ध्याला परत येणार होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करुन अहवाल तपासणीकरिता पाठविला असता सोमवारी तो अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

सुदामपुरी ‘कंटेन्मेंट झोन’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर कोरोना रुग्णापासून लांब असतानाच सुदामपुरी परिसरातील एक व्यक्ती सिकंदराबाद येथे पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. जिल्हा प्रशासनाला माहिती मिळताच सोमवारी दुपारी प्रशासनाने सुदामपुरी परिसर गाठून उपाययोजना सुरु केल्यात. सुदामपुरीतील रुग्णाच्या घराच्या परिसरातील दीडशे घरांना प्रतिबंधित क्षेत्रात टाकण्यात आले असून या परिसरीत रस्ते सील केले आहे.
सुदामपूरी येथील रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय व्यक्तीला यकृताच्या आजारामुळे १७ मे रोजी तेलगणामधील सिकंदराबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिकंदराबाद येथील रुग्णालयात सात दिवस उपचार घेतल्यानंतर ते वर्ध्याला परत येणार होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करुन अहवाल तपासणीकरिता पाठविला असता सोमवारी तो अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळताच लगेच उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिघेकर यांच्यासह कोविड-१९ पथक, आरोग्य विभागाचे कर्मचारी व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुदामपुरी परिसरात धाव घेतली. त्यांनी रुग्णाच्या घराचा शोध घेऊन लगतच्या परिसरातील जवळपास दीडशे घरांचा परिसर सील केला. या परिसरातील प्रत्येक नागरिकांचे सर्व्हेक्षण करुन त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत सर्वेक्षणाचे काम सुरु होते. आता या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना १४ दिवस घरातच क्वारंटाईन राहावे लागणार आहेत. त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू व इतर सेवा पुरविण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे.
सुदामपुरी येथील व्यक्ती सिकंदराबाद येथे पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच त्यांच्या संपर्कातील १७ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या सर्वांचे स्वॅब नमूने घेऊन तपासणीकरिता पाठविले जाणार आहे. तसेच सुदामपुरी परिसरातील नागरिकांचीही आरोग्य तपासणी करण्याकरिता तालुका अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण सुरु केले आहे.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक.
सुदामपूरी परिसरातील जवळपास दीडशे घरांचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण सुुर केले आहे. रात्री साडेनऊ वाजतापर्यंत हे काम चालणार असून मंगळवारी या सर्वांची आरोग्य तपासणी केली जाईल.
- प्रदीप जगताप, मुख्याधिकारी, नगर पालिका वर्धा.
कंटेन्मेंट व बफर झोनचे निर्जंतुकीकरण
सुदामपुरी परिसरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर पालिका प्रशासनाकडून या परिसरात ध्वनिक्षेपकावरुन माहिती देऊन सर्व नागरिकांना सूचना करण्यात आल्या.
त्यानंतर तत्काळ प्रशासनाकडून कंटेन्मेंट झोन व बफरझोन तयार करण्यात आले आहे. याचीही माहिती प्रत्येक नागरिकांना दिली असून या परिसराचे निर्जंतुकीकरण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.