नांदगाव चौरस्त्यावर भुयारी मार्ग
By Admin | Updated: September 27, 2015 01:33 IST2015-09-27T01:33:17+5:302015-09-27T01:33:17+5:30
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील नांदगाव-चौरस्त्यावरील भुयारी मार्गाकरिता केंद्र शासनाकडून १५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

नांदगाव चौरस्त्यावर भुयारी मार्ग
रामदास तडस यांची माहिती : प्रकल्पाकरिता १५ कोटी मंजूर
हिंगणघाट : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील नांदगाव-चौरस्त्यावरील भुयारी मार्गाकरिता केंद्र शासनाकडून १५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला येत्या नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्यक्षात प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी येथील विश्रामगृहात दिली.
यावेळी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, वामन खोडे, भाजपा शहराध्यक्ष सुभाष कुंटेवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी खासदार तडस यांनी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौरस्तावर उड्डाण पूल व्हावा याकरिता गत अनेक वर्षांपासून येथील जनतेची मागणी होती. नांदगाव मार्गावर हिंगणघाट शहराचे विस्तारीकरण झाले आहे; परंतु राष्ट्रीय महामार्गावरील भर वेगाने धावणाऱ्या वाहनामुळे अनेक अपघात घडले. येथे अनेक मोठे अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
खासदार तडस यांनी या मागणीची दखल घेऊन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला तसेच आमदार समीर कुणावार व नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांनी तडस यांच्यामार्फत या कामासंबंधीचा प्रस्ताव सादर केला. अखेर त्याला यश प्राप्त होऊन वार्षिक नियोजन मंडळाकडून उड्डाणपूल बांधकामाकरिता १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. नोव्हेंबर २०१५ पासून कामाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात होणार असून दीड वर्षात काम पूर्ण होईल, अशी माहिती खासदार तडस यांनी दिली. यामुळे गत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग अथॉरटी आॅफ इंडियाचे अरविंद काळे, आशुतोष पिंपळे, जे.एन. डबे, तसेच प्रदीप जोशी, बिसमिल्ला खान, गणेश उगे, कौसर अंजुम, कमलाकर येसनसुरे, अमोल बोरकर, कौसर अंजुम अविनाश आईटलावार, योगेश खोडे, श्याम भिमनवार, मनोज रूपारेल, योगेश खोडे, अशोक चंदनखेडे, राजेश कासवा यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)