चौकशीदरम्यान उपनिरीक्षक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2015 01:46 IST2015-06-22T01:46:01+5:302015-06-22T01:46:01+5:30
सेलू पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी याच्यावर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीदरम्यान उपनिरीक्षक फरार
विनयभंगाचा गुन्हा : वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष लघुशंकेच्या बहाण्याने पसार
बोरधरण : सेलू पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी याच्यावर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या तपासाकरिता शनिवारी रात्री उपअधीक्षक स्मिता नागने सेलू पोलीस ठाण्यात गेल्या असता चौधरी याने लघुशंकेचे कारण काढत पळ काढला. यामुळे जिल्हा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवारी घटना घडली त्या हॉटेलात जात पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. यावेळी हॉटेलचा मालक व आणखी एकाचे बयाण नोंदविण्यात आले.
सेलू पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी याचा कार्यकाळ विविध कारणाने गाजला आहे. बोर परिसरातील एका हॉटेलात त्याने केलेल्या कृत्यावरून त्याच्यावर सेलू ठाण्यात भादंविच्या कलम ३५४, ३५४ (ब), ३४ तसेच अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्याच्या (३), (१), १२ कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. असा प्रकार करण्याची त्याची पहिली वेळ नसून यापूर्वीही असे प्रकार घडल्याची चर्चा आहे.
चौधरीच्या या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या एका युवतीने अखेर १९ जून रोजी सेलू पोलिसात तक्रार नोंदविली. यात पोलीस कर्मचाऱ्याविरूद्ध तक्रार असल्याने पोलिसांकडून तपासात हयगय झाल्याचा आरोप आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने अखेर २० जून रोजी चौकशी करून चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद होत असतानाच पोलीस अधिकारी स्मिता नागने यांच्या हातावर तुरी देत चौधरी याने पळ काढला. पोलीस त्याच्या शोधात आहे.(वार्ताहर)