आॅटो चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाचा बडगा
By Admin | Updated: July 31, 2016 00:48 IST2016-07-31T00:48:42+5:302016-07-31T00:48:42+5:30
खासगी वाहनातून होत असलेली प्रवासी वाहतूक आणि क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याचे कारण पूढे करीत

आॅटो चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाचा बडगा
कारवाई नियमबाह्य : संघटनेचा आरोप, आमदारांना साकडे
वर्धा : खासगी वाहनातून होत असलेली प्रवासी वाहतूक आणि क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याचे कारण पूढे करीत उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे सेलू तालुक्यातील हिंगणी येथील आॅटो चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई नियमाला अनुसरून नसल्याचे सांगत आॅटो चालक संघटनेने शनिवारी आ.डॉ. पंकज भोयर यांना निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, हिंगणी येथील आॅटोचालक सुशिक्षित बेरोजगार आहे. या परिसरात दुसरा कोणताही व्यवसाय नसल्याने याच व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. हा व्यवसास गत १५ ते २० वर्षांपासून सुरू आहे. येथील आॅटो रिक्षा चालक कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन करीत नाहीत. प्रामाणिकपणे आपला व्यवयास करीत आहेत. अशात गत एक वर्षापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून हेतुपुरस्सर ‘हिंगणी परिक्षेत्रातील’ आॅटो जप्त करण्याचा धडाका सुरू आहे. जप्त केलेले आॅटो सेलू पोलीस ठाण्यात घेऊन जात चालकांकडून पाच ते सहा हजार रुपये दंड उकळला जात आहे. हा दंड भरल्यानंतर एक महिन्याने आॅटो सोडण्यात येत असल्याचे चालकांनी निवेदनात नमूद केले आहे. या कारवाईमुळे आॅटो रीक्षा चालक मालक हवालदिल झाले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय नसल्याने आता आम्हीही आत्महत्या करावी काय, असा संतप्त सवाल त्यांनी निवेदनातून केला आहे.
आ.डॉ. भोयर यांना निवेदन देताना आॅटो युनियन अध्यक्ष किशोर बावणे, श्रीकांत नांदेकर, प्रीतम पाटील, विजय मनने, अनिल मोहरले, झिरीया, नरेश वाटगुळे, जावेद शेख, बाबाराव चौधरी, राहुल सहारे, महेश लाकडे, अजय येनकर, जावेद शेख जावेद झिरीया, मजिद शेख यांच्यासह आॅटो मालक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)