बंद बसफेरीमुळे विद्यार्थ्यांची पायपीट
By Admin | Updated: August 3, 2016 01:19 IST2016-08-03T01:19:47+5:302016-08-03T01:19:47+5:30
हिंगणी-बोरधरण मार्गावरील दोन पुलांचे बांधकाम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे गावातील बसफेरी बंद झाली आहे.

बंद बसफेरीमुळे विद्यार्थ्यांची पायपीट
सेलू : हिंगणी-बोरधरण मार्गावरील दोन पुलांचे बांधकाम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे गावातील बसफेरी बंद झाली आहे. परिणामी येथील विद्यार्थ्यांची पायपीट सुरू झाली आहे.
पावसाळ्यात या मार्गावरील पर्यायी वळण रस्त्यावरील सिमेंट पाईपवर टाकलेला मुरूम वाहून गेला. काळ्या मातीमुळे या मार्गावर चिखल झाल्याने बोरधरण येथे जाणारी बसच गावात येत नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फटफजीती झाली आहे. हिंगणीपासून बोरधरणकडे जाताना जवळपास १ कि.मी अंतरावर दोन पुलांचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम कासवगतीने होत असल्याचे दिसते.
संबंधीत विभाग आणि कंत्राटदार यांच्याकडून काम पूर्ण करण्याबाबत सतत दुर्लक्ष केले जाते. उन्हाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक असताना तसे झाले नाही. आता त्याचे परिणाम येथील गावकऱ्यांना भोगावे लागत आहे.
या पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून केलेला सिमेंट पायल्यांचा पूल खचला. त्यामुळे चिखल झाला आहे. आता नियमीत जाणारी बोरधरण बस बंद आहे. बोरी (कोकाटे), बोरधरण येथील विद्यार्थ्यांना बसअभावी खाजगी वाहनांचा आधार घेत शिक्षणासाठी सेलू व वर्धा व इतरत्र जावे लागते. या समस्ये संदर्भात लोकप्रतिनिधी चुप्पी साधून असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. बोरी (कोकाटे) येथील राजेंद्र कोकाटे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी तक्रार करीत पुलाचे काम पूर्ण करून बस सुरू करण्याबाबत कैफीयत मांडली. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)
खासगी वाहनांचा आधार
बोरी (कोकाटे), बोरधरण येथील विद्यार्थ्यांना बसअभावी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. गावातील बसफेरी पावसाळ्यात बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालय येथे जाण्याकरिता खासगी वाहनांशिवाय पर्याय नसतो. अनेकदा विद्यार्थी वाहन न मिळाल्यास अडकुन पडतात. यावर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.