विद्यार्थ्यांनी घेतले पोलीस कामकाजाचे ज्ञान
By Admin | Updated: January 3, 2016 02:40 IST2016-01-03T02:40:36+5:302016-01-03T02:40:36+5:30
पोलीस म्हटले की आजही सर्वसामान्यांच्या अंगात धडकी भरते. यामुळे सर्वसामान्य नागरिक व पोलिसात सलोख्याचे संबंध निर्माण ...

विद्यार्थ्यांनी घेतले पोलीस कामकाजाचे ज्ञान
पोलीस स्थापना दिन : मुख्यालयात दिली शस्त्रास्त्राची माहिती; सहा शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
वर्धा : पोलीस म्हटले की आजही सर्वसामान्यांच्या अंगात धडकी भरते. यामुळे सर्वसामान्य नागरिक व पोलिसात सलोख्याचे संबंध निर्माण व्हावे याकरिता पोलिसांच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. शनिवारी पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधत सहा शाळेतील विद्यार्थ्यांना शहर ठाण्यात पोलिसांच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. यात विद्यार्थ्यांनीही त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसरण करून घेतले.
शहर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, विक्रम साळी यांच्यासह शहर ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर बुराडे, रामनगर ठाण्याचे निरीक्षक विजय मगर, वाहतूक शाखेचे निरीक्षक बहाद्दुरे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पोलिसांची गरज काय, त्यांची कार्यपद्धती काय या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यानंतर उपस्थिती विद्यार्थ्यांना शहर ठाण्यात नेत येथे चालणाऱ्या कामाची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी शहर ठाण्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी येथे होणाऱ्या कामाची माहिती घेतली. स्टेशन डायरी म्हणजे काय, त्यावर तक्रार दाखल करताना घेण्यात येत असलेली माहिती, एफआयआर कसा तयार होतो, बिनतारी संदेश यंत्रणेतून कशी माहिती येते याची सविस्तर माहिती उपस्थित पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली. यानंतर शहरातून पोलीस पथकाची रॅली काढण्यात आली. यात पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आपला सहभा नोंदविला.
ही रॅली शहर ठाण्यातून निघून बजाज चौक, सोशालिस्ट चौक, इंगोले चौक मार्गे अंबिका चौक, पटेल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पोलीस मुख्यालयात पोहोचली. येथे विद्यार्थ्यांना पोलिसांकडे असलेल्या शस्त्राची माहिती देण्यात आली. शिवाय त्याचा वापर कसा करावा या संदर्भात माहिती देण्यात आली. यानंतर रॅलीचा समारोप झाला.(प्रतिनिधी)
थोडी भीती आणि कुतूहल
पोलीस आणि सामान्य यांच्यातील दरी कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सामान्य नागरिक पोलीस ठाण्याची पायरी चढायलाही तयार नसतात. त्यामुळे चक्क शाळकरी मुलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांच्या कामाचे अध्ययन करणे ही बाब कुतूहलाचीच होती. पोलीस आपल्याला रागावले तर अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनात होती. पण काहीच क्षणात ही भीती नाहिशी झाली. मुलांनी त्यांच्या मनात असलेल्या शंकांना वाट मोकळी करून दिली. वरिष्ठांनीही अतिशय सोप्या भाषेत त्यांना पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती समजावून सांगितली. चक्क पोलिसांसमवेत एक दिवस घालवल्याने शाळकरी मुलेही हरखून गेली होती. तसेच त्यांना मनातील भीतीही पळून गेली होती.