विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू सेवन न करण्याची शपथ

By Admin | Updated: April 8, 2016 01:51 IST2016-04-08T01:51:20+5:302016-04-08T01:51:20+5:30

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही व इतरांना तसेच करण्यापासून परावृत्त करेल.

Students take oath not to take tobacco | विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू सेवन न करण्याची शपथ

विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू सेवन न करण्याची शपथ

आशुतोष सलील : व्यसनापासून दूर राहून आरोग्य तंदुरूस्त ठेवा
वर्धा : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही व इतरांना तसेच करण्यापासून परावृत्त करेल. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. मी व्यसनाच्या आहारी जाणार अथवा कुणाच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही. निरोगी व सुदृढ आयुष्य जगेल, मी स्वत:ला कुटुंबाला, समाजाला व देशाला व्यसनमुक्त व निरोगी घडविण्याची प्रतिज्ञा जागतिक आरोग्य दिनी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
गुरुवारी न्यू इंग्लिश विद्यालयाच्या सभागृह मैदानावर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. कार्र्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आशुतोष सलील होते. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.डी. मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अस्थिव्यंग शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर, प्राचार्य विजय व्यास यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सलील म्हणाले, अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळाला महत्त्व देऊन दररोज मैदानी खेळ खेळावेत. व्यसनापासून दूर राहून आरोग्य सुदृढ राखण्यासाठी तंबाखूचे सेवन करू नये. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मधुमेहामुळे दृष्टी, हृदय, किडनीवर दुष्परिणाम होतो. रक्तदाबही वाढतो, अकाली मृत्यू येतो. म्हणून प्रत्येकाने मधुमेहमुक्त समाज घडविण्यासाठी पुढे यावे. बदलत्या जीवनशैलीत विशेषत: अकरावी, बारावीतील विद्यार्थ्यांनी धुम्रपानाच्या आहारी जाऊ नये. तंबाखूमुळे कर्करोग होतो. त्यामुळे या व्यसनांपासून दूर रहावे. अभ्यासासोबतच मैदानी खेळ खेळावेत. खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते त्याशिवाय व्यक्तीमत्व विकासात भर पडते. सर्वांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी जीवन घडविण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन न करण्याची शपथ दिली.
प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी यांनी करून त्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदीया, डॉ. आकरे, डॉ. रहाटे आदींसह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी विविध शाळांचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Students take oath not to take tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.