चोरीचा आळ घेतल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Updated: January 31, 2016 02:13 IST2016-01-31T02:13:06+5:302016-01-31T02:13:06+5:30

शाळेतील सहकारी विद्यार्थिनीचा मोबाईल चोरल्याचा आळ असह्य झालेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून ....

Student's suicide due to theft | चोरीचा आळ घेतल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

चोरीचा आळ घेतल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

संतप्त नागरिकांची मृतदेहासह शाळेवर धडक
वर्धा : शाळेतील सहकारी विद्यार्थिनीचा मोबाईल चोरल्याचा आळ असह्य झालेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी रात्री येथील गजानन नगरात घडली. निकिता वाल्मिक अंड्रसकर (१६) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. निकिताने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तिच्यावर शिक्षिकेने चोरीचा आळ लावल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणी रामगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा केसरीमल कन्या शाळेतील तिच्या वर्गशिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षिकेकडून मिळालेल्या वागणुकीमुळे दुखावलेल्या निकिताच्या आत्महत्येमुळे संतापलेल्या परिसरातील नागरिकांनी जोपर्यंत शिक्षिकेला अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर पोलिसांनी सदर शिक्षिकेला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह थेट शाळेत आणण्यात आला. सदर वर्गशिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणातील शिक्षिकेशी चौकशी करून तिच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याध्यापकांनी दिल्यानंतर वातावरण निवळले. संबंधित शिक्षिका रजेवर असल्याचे समोर आले. शिवाय या चोरी प्रकरणाची कुठलीही माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकेला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यानंतर निकिताचा मृतदेह घरी नेण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदाबस्त ठेवण्यात आला होता.
तत्पूर्वी एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत या प्रकरणातील दोषी शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनातून केली. सदर निवेदन पोलीस उपअधीक्षक (गृह) यांनी स्वीकारले. या निवेदनानुसार निकीताच्या वर्गशिक्षिकेकडून तिला सतत त्रास होत होता. शिवाय या चोरीच्या प्रकरणातून वाचण्याकरिता घरकामाला येण्याची धमकी तिला देण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उपस्थित संतप्त नागरिकांकडून करण्यात आली.


वर्गशिक्षिकेवर गुन्हा दाखल
वर्धा : गजानननगर येथे निकिता अंड्रसकर नामक विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावरून पोलिसांनी गजानननगर येथे घटनास्थळ गाठत पाहणी केली. तिने घरी कुणी नसताना राहत्या घरी गळफास लावल्याचे दिसून आले. निकिताचे वडील मिस्त्रिकाम करतात तर तिची आई सूतगिरणीत कामाला जात असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळाच्या पंचनाम्यात निकिताने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली. यात तिच्यावर तिच्या वर्ग मैत्रिणीचा मोबाईल चोरल्याचा आळ आणल्याचे नमूद होते. ती मोबाईलची रक्कमही गोळा करीत असल्याचाही उल्लेख आहे. यासाठी वर्गशिक्षिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यावरून रामनगर पोलीस ठाण्यात वर्गशिक्षिकेवर भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार विजय मगर यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Student's suicide due to theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.