बससाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या
By Admin | Updated: July 25, 2015 02:14 IST2015-07-25T02:14:31+5:302015-07-25T02:14:31+5:30
मागण्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे नजीकच्या अंदोरी येथील विद्यार्थी संघटना व गावकऱ्यांनी परिवहन महामंडळाच्या सहा गाड्या पाच तासापर्यंत ...

बससाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या
अंदोरी येथील घटना : सहा बस पाच तास रोखल्या
देवळी : मागण्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे नजीकच्या अंदोरी येथील विद्यार्थी संघटना व गावकऱ्यांनी परिवहन महामंडळाच्या सहा गाड्या पाच तासापर्यंत अडवून धरून शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. यामुळे झोपेतून खडबडून जागे झालेल्या वर्धा व पुलगाव परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अंदोरी येथे धाव घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ठरल्याप्रमाणे मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे या रस्त्याने महामंडळाची एकही बसगाडी जावू देणार नसल्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
अंदोरी सारख्या मोठ्या गावात सकाळच्या वेळी महामंडळाची बस नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व कामगारांना देवळी येथे जाण्यास अडचण होत आहे. आंजी येथे मुक्कामी असलेली बस अंदोरी येथे पूर्णत: भरून येत असल्यामुळे गावातील विद्यार्थी वंचित राहतात. त्यातच परिसरातील मोमीनपूर, गणेशपूर व बोपापूर (वाणी) येथील विद्यार्थी अंदोरी येथे पायी चालत येत असल्यामुळे याठिकाणी विद्यार्थ्यांनी संख्या वाढली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत शाळेच्या दोन तासिका होतपर्यंत गावात बस येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनासमोर दंडीत होण्यासोबतच शिक्षणाला मुकावे लागत आहे. त्यामुळे सकाळी ६.१५ वाजताच्या दरम्यान अंदोरीसाठी वेगळी बस देण्यात यावी. तसेच मोमीनपूर येथे रात्रीच्या वेळेस बस मुक्कामी ठेवण्यात यावी आदी मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या.
देवळी येथील बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची व मुत्रीघराची व्यवस्था नसल्यामुळे गावखेड्यातील विद्यार्थी-विद्यार्र्थिंनींना संकोचाला सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे छेडखानीचे प्रकार वाढले आहे. या स्थानकाची कार्यालयीन वेळ सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत असताना याठिकाणी रात्री कोणताही कर्मचारी राहत नाही. कारण नसताना विद्यार्थ्यांना एसटीची सवलत पास देण्यास विलंब करून अरेरावीची भाषा वापरली जाते. महिला कर्मचारी हेकेखोरीने विद्यार्थ्यांना अपमानीत व्हावे लागते आहे. बरेचदा बसभाडे देवून सुद्धा तिकीट न देण्याचे प्रकार होत आहे. परिवहन अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा या सर्व प्रकाराला कारणीभूत असल्याचा आरोप आहे. तालुक्याचे ठिकाण व खासदाराचे निवास असलेल्या या गावात असे प्रकार व समस्या असतील तर इतरांचे काय, अशी चर्चा होत आहे. या आंदोलनात किरण गडवाल यांच्यासह सोनू गावंडे, वैभव ढोले, वैभव कराळे, मंगेश गावंडे, कुणाल शिरसमर, तसेच सरपंच जय वाकडे, गौरव झाडे, वैभव मोहोड, पोलीस पाटील हेमंत ढोले व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. परिवहन मंडळाच्यावतीने वर्धा आगर व्यवस्थापक जी.डी. ताकसांडे, पुलगाव व्यवस्थापक बी.एम. भांगे व अधिकारी चर्चेत सहभाग होते.(प्रतिनिधी)