परीक्षा शुल्क परतीकरिता विद्यार्थ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: March 4, 2015 02:15 IST2015-03-04T02:15:08+5:302015-03-04T02:15:08+5:30
येथील ओम अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्यास टाळाटाळ

परीक्षा शुल्क परतीकरिता विद्यार्थ्यांचे आंदोलन
वर्धा : येथील ओम अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन पुकारले. यावेळी महाविद्यालयाने दिलेल्या आश्वासनामुळे विद्यार्थ्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले.
इंझापूर येथील ओम कॉलेज आॅफ इंजिनिअरींग मधील प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क परत मिळण्याबाबत प्रशासनाला मागणी केली. परीक्षा पत्र भरताना भरलेले शुल्क उत्तीर्ण झाल्यानंतर परत देण्याचा नियम आहे. या बाबत विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्रशासनाला विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाले. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वगावी जाण्याची वेळ आली आहे. तरीही विद्यालयाकडून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळाले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. याबाबत विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना सतत विचारणा केली त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही.
यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज महाविद्यालयाच्या आवारात आंदोलन आंदोलन केले. या आंदोलनात प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ ठिय्या मांडला. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना लवकरच परीक्षा शुल्काची रक्कम देण्यात येईल असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी हेच आश्वासन लिखित स्वरुपात देण्याची मागणी केली असता त्यांनी लेखी देण्यास नकार दिला. यामुळे दुपारपर्यत आंदोलन सुरूच होते. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन चर्चेतून मार्ग निघाल्याने मागे घेतले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क अवघ्या १५ दिवसात देण्यात येईल.
- डॉ. संतोष येंडे, प्राचार्य,ओम कॉलेज
शासनाच्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क लवकरात लवकर परत दिल्या जाईल.
- लक्ष्मण पिसुळकर, संस्थाध्यक्ष, ओम कॉलेज