विद्यार्थ्यांनी जाणले विविध पक्ष्यांचे भावविश्व
By Admin | Updated: September 26, 2015 02:14 IST2015-09-26T02:14:49+5:302015-09-26T02:14:49+5:30
येथील आनंद निकेतन विद्यालयात या वर्षी सेवाग्राम आश्रम परिसरातील जैवविविधता हा अभ्यास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी जाणले विविध पक्ष्यांचे भावविश्व
जैवविविधता प्रकल्प : २०० विद्यार्थ्यांचा सहभाग
सेवाग्राम : येथील आनंद निकेतन विद्यालयात या वर्षी सेवाग्राम आश्रम परिसरातील जैवविविधता हा अभ्यास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणजे परिसरातील पक्ष्यांचे वैविध्य अभ्यासणे हा आहे. यासाठी पक्षीप्रेमी प्रा. किशोर वानखेडे व प्रभाकर पुसदकर यांच्या मार्गदर्शनात परिसरात विद्यार्थ्यांसह भ्रमंती करण्यात आली.
भ्रमंतीदरम्यान विविध प्रकारच्या वृक्षराजी, शेती व शेततळ्यांनी समृद्ध परिसरात विद्यार्थ्यांना ३५ प्रकारच्या पक्ष्यांची ओळख मार्गदर्शकांनी करून दिली. मुलांनीही निरीक्षणाच्या नोंदी घेतल्या. यावेळी प्रा. वानखेडे म्हणाले, निसर्गातील पक्ष्यांचे स्थान व मानवासाठी त्यांचे योगदान आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे. बालपणापासून परिसरातील पक्ष्यांचे निरीक्षण व अभ्यास करण्याची संधी मिळाल्यास त्यांच्यातील वैविध्य व सौंदर्य टिपण्याची सवय तुम्हाला सहजपणे लागेल. मार्गदर्शनासह स्वत:चे अनेक अनुभवही वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सोबतच निसर्गातील पक्ष्यांचे प्रकार, त्यांचे महत्त्व यावर स्लाईड शो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यालयातील २०० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका सुषमा शर्मा यांनी प्रास्ताविक केले. जीवन अवथरे यांनी सर्वांचे आभार मानले.(वार्ताहर)