विद्यार्थिनीच्या पतीकडून प्राध्यापकास मारहाण
By Admin | Updated: May 16, 2016 02:22 IST2016-05-16T02:22:08+5:302016-05-16T02:22:08+5:30
कॉपी प्रकरण निपटल्यानंतर पेपर सुटताच सदर परीक्षार्थीच्या पतीने प्रा. डॉ. पांडे यांना महाविद्यालयाच्या आवारात मारहाण करून सेंटरवर

विद्यार्थिनीच्या पतीकडून प्राध्यापकास मारहाण
आर्वीचे कॉपी प्रकरण : खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप
आर्वी : कॉपी प्रकरण निपटल्यानंतर पेपर सुटताच सदर परीक्षार्थीच्या पतीने प्रा. डॉ. पांडे यांना महाविद्यालयाच्या आवारात मारहाण करून सेंटरवर सर्वांना कॉपी करू द्या असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.
घडलेल्या घटनेची तक्रार डॉ. पांडे यांनी आर्वी पोलिसात दिली. सदर रिपोर्ट दिल्याच्या तब्बल तीन तासानंतर परीक्षार्र्थीने प्रा. डॉ. पांडे विरूद्ध आर्वी ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही. पोलिसांनी या घटनेबाबत कुठलीही सत्यता जाणून न घेता प्रा. पांडे विरूद्ध ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
आर्वी पोलिसांनी द्वेषापोटी पांडे यांचे विरूध्द कुठलीही चौकशी न करता गुन्हा दाखल करून त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवल्याची व या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून न्याय देण्याची मागणी एका निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. तसेच सदर विद्यार्थिनीच्या पतीनेही आकसापोटी हा प्रकार केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे सबंधितांवार कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
याबाबतची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, पोलीस महासंचालक, आ. अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे यांच्याकडे केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
परीक्षा केंद्रावर कॉपी करताना हटकले असता परीक्षार्थीच्या पतीनेच मला मारहाण करून आपल्या पत्नीला माझ्याविरूद्ध विनयभंगाची तक्रार करण्यास लावली. शिवाय तिच्या पतीने मला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. परीक्षा केंद्रावर कॉपी करू न देत असल्याबद्दल माझ्या विरूद्ध हे षडयंत्र रचले आहे.
-प्रा. डॉ. श्यामप्रकाश पांडे, परीक्षा केंद्राधिकारी, आर्वी