विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण हस्तगत करून रोजगाराचा पर्याय शोधावा
By Admin | Updated: November 5, 2015 02:35 IST2015-11-05T02:35:40+5:302015-11-05T02:35:40+5:30
औद्योगिककरण झपाट्याने होत आहे. यामुळे कुशल कामगारांची दिवसेंदिवस टंचाई भासत आहे. पारंपरिक शिक्षण

विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण हस्तगत करून रोजगाराचा पर्याय शोधावा
देवळी : औद्योगिककरण झपाट्याने होत आहे. यामुळे कुशल कामगारांची दिवसेंदिवस टंचाई भासत आहे. पारंपरिक शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही वाढत आहे. यामुळे त्यांच्या हातांना काम नाही. अकुशल कामगार म्हणून उद्योजक त्यांना स्वीकारत नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण हस्तगत करून रोजगाराचा पर्याय शोधावा, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
सविताराणी नारायणदास जावंधिया महा. मध्ये तांत्रिक कौशल्य विकास तसेच उच्च शिक्षण पाहणी विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर अतिथी म्हणून मोहनलाल अग्रवाल, जनता ज्यूनिअरच्या प्राचार्य संध्या कापसे, प्रा. नरेंद्र मदनकर, प्रा. विकास काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य एस.आर. उपाध्याय यांनी केले.
कार्यशाळेत तांत्रिक कौशल्य विकास विषयावर बोलताना खा. तडस यांनी विद्यार्थ्यांना परिश्रमाची तयारी ठेवण्याचे आवाहनही केले. अग्रवाल यांनी वेळेचे नियोजन करून विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी परिश्रम करावे, असे सांगितले. उच्च शिक्षण पाहणी अहवालावर प्राचार्य कापसे आणि प्रा. मदनकर यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. गणेश मालधुरे यांनी केले तर आभार प्रा. संतोष मोहदुरे यांनी मानले. यावेळी महालक्ष्मी इंडस्ट्रीजचे मॅनेजर प्रकाश दुधकावळे यांनी तांत्रिक कौशल्य व रोजगार या विषयावर संबंधितांसोबत चर्चा केली. कार्यक्रमाला स्थानिक शाळांचे शिक्षक तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)