विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी बापूंच्या भूमीतून प्रेरणा घ्यावी
By Admin | Updated: February 15, 2017 02:30 IST2017-02-15T02:30:36+5:302017-02-15T02:30:36+5:30
समाजाच्या विकासात व्यसनमुक्ती आणि स्वच्छता सफाईचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी बापूंच्या भूमीतून प्रेरणा घ्यावी
शैलेश नवाल : नई तालीमच्या प्रांगणात रंगला बाल महोत्सव आणि शिक्षण मेळावा
सेवाग्राम : समाजाच्या विकासात व्यसनमुक्ती आणि स्वच्छता सफाईचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नई तालीमद्वारे आयोजित बाल महोत्सव आणि शिक्षक मेळाव्यात सहभागी विद्यार्थी आणि शाळांना या उपक्रमातून स्फुरण चढणार आहे. जिल्ह्यातील अन्य शाळा आणि विद्यार्थ्यांनीही या बापूंच्या भूमीतून प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केले.
नई तालीमच्यावतीने महात्मा गांधी आश्रम परिसरात या तीन दिवसीय निवासी बाल महोत्सव व शिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. बाल महोत्सव व शिक्षक मेळाव्यात जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ५७ शाळा आणि ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि तरुणांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, नई तालीमचे मंत्री प्रा. प्रदीप दासगुप्ता, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, प्राचार्य डॉ. रेखा महाजन, डॉ. देवानंद सावरकर, डॉ. किरण धांडे, अधिव्याख्याता सीमा पुसदकर, प्रा. उर्मिला हाडेकर, प्रभाकर पुसदकर आदी उपस्थित होते. उद्घाटन बाल प्रतिनिधी म्हणून बेलगावची आचल, चांदणीची प्रिया राठोड आणि करंजीचा समीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धा आणि चढाओढ यापेक्षा सहकार्य आणि सामूहिकता हाच विकासाचा आधार ठरू शकतो. यामुळे स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धेत टिकण्यासाठी चढाओढ करणे शिकविण्यापेक्षा सहकार्य आणि सामूहिकतेचे धडे देणे गरजेचे आहे, असे मत प्रा. दासगुप्ता यांनी व्यक्त केले.
तिसऱ्या दिवशी मुलांनी तालुका व केंद्रनिहाय २१ गटात गटचर्चा करून आमचे गाव कसे असेल, आम्ही काय करू शकतो व शाळा काय करेल, वर्षभरात कोणते कार्यक्रम बनवू याबाबत चर्चा केली. त्यांच्या गटातील एकाने सादरीकरण केले. इयत्ता चौथी ते सातवीच्या मुलांनी या सादरीकरणात सहभाग घेतला. सोबतच मनोगतही व्यक्त केले. मुलांनी गांधींजींच्या सेवाग्राम गावाच्या विकासाबाबत काय करणार, याचा निर्धार व नियोजन केले, हे महोत्सव व मेळाव्याचे फलित होय. समारोप प्रसंगी प्रत्येक शाळेला महाराष्ट्रातील थोर पुरुष महात्मा फुले ते गांधींपर्यंतची चरित्र असलेल्या १२ पुस्तकांचा संच भेट दिला.
समारोपप्रसंगी म. गांधी हिंदी विद्यापीठाचे डॉ. मनोज कुमार यांनी गांधीजींच्या आठवणी सांगत शुभेच्छा दिल्या. नागपूरचे विदर्भ पर्यावरण परिषदेचे संजय सोनटक्के यांनी मुलांच्या कार्याचे आणि सादरीकरणाचे कौतुक करीत त्यांच्या जीवनातील ही संधी निश्चित देश घडविण्यात अग्रेसर राहील, असे सांगितले. डॉ. रेखा महाजन यांनी सर्व मुलांना त्यांनी केलेला संकल्प पूर्ण करण्याकरिता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर पुसदकर यांनी केले तर आभार सीमा पुसदकर यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता नई तालीमचे शिवचरण ठाकुर, पवनभाई, विनय करुळे, संदीप भगत, अनिल पेंदाम, प्राजक्ता, पियुष राऊत, प्रफुल्ल उचके, आदित्य चावरे, किरण निधेकर, मिलन पवार, तेजस्विनी कोठारे, प्रज्ञा नगराळे, संगीता चारमोरे, सचिन नाखले, अनुश्री दोडके, स्वाती दुधकोहळे, लक्ष्मी काकडे, ज्योत्सना वरघट, राहुल श्रीवास, रानी, वर्षा ओरके तसेच शिक्षक वैशाली चिकटे, अनिता भारती, विद्या वालोकर, सीमा मेहता, मंगल डोंगरे, अंजली डाखोळे, सुनीता धामंदे, छाया भगत, देवेंद्र गाठे, संजय वाढवे, मनीषा ढोले, गौतम पाटील यासह शीतल देशमुख, विद्या वाघमारे, अर्चना मिश्रा, वंजारी, आखडे यांच्यासह आश्रमातील मान्यवरांनी सहकार्य केले.(वार्ताहर)