पासेससाठी विद्यार्थ्यांची गर्दी
By Admin | Updated: August 4, 2015 02:10 IST2015-08-04T02:10:08+5:302015-08-04T02:10:08+5:30
स्थानिक बस स्थानकामध्ये कर्मचारी कमी आहेत. यामुळे बसेसचे टाईम, योजनांचे नियोजन करण्यास दिरंगाई होत

पासेससाठी विद्यार्थ्यांची गर्दी
आष्टी (शहीद) : स्थानिक बस स्थानकामध्ये कर्मचारी कमी आहेत. यामुळे बसेसचे टाईम, योजनांचे नियोजन करण्यास दिरंगाई होत आहे. गत आठवड्यापासून विद्यार्थ्यांची मासिक पाससाठी गर्दी होत आहे. खिडकी उघडण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या रांगा लागत असल्याने प्रवाश्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक बस स्थानकामध्ये एक कर्मचारी कार्यरत आहे पण तोही नियमित येत नसल्याने कामे खोळंबली आहेत. आष्टी तालुक्याचे ठिकाण असल्याने कनिष्ठ महाविद्यालय, हायस्कूलमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यासाठी मासिक पास विद्यार्थ्यांनी काढल्या आहेत. महिना संपल्यावर नवीन पास काढण्यासाठी विद्यार्थी बसस्थानक नियंत्रक कक्षात येतात. यावेळी संबंधित कर्मचारी आज या, उद्या या असा सल्ला देत असल्याने रोखीने पैसे खर्च करून प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना वर्ग सुरू झाल्यावरही पाससाठी ताटकळावे लागत आहे.
बसस्थानक परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शौचालय, बाथरूम घाणीने माखले आहे. वराहांचा मुक्तसंचार आहे. प्लास्टिकच्या विविध वस्तू कचऱ्याच्या ढिगाऱ्याप्रमाणे पडून आहे. पाण्याची टाकी शेवाळली असून गढूळ व दूषित पाणी प्रवाश्यांना नाईलाजाने प्यावे लागते. कचरा झाडून साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवला जात नाही.
तळेगाव आगार प्रमुखांनी वारंवार लेखी तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. यातच मासिक पास वाटपामध्येही घोळ झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी तळेगाव आगार प्रमुखांनी नियमित दोन कर्मचारी कार्यरत ठेवावे आणि विद्यार्थ्यांना सुविधा पुरवाव्या, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
दूरध्वनी सेवा बंद
४बीएसएनएल अंतर्गत लॅन्डलाईन सेवा तीन महिन्यांपासून बंद आहे. प्रवाश्यांनी संपर्क केल्यावर फोनची सेवा नादुरूस्त आहे, एवढेच सांगितले जाते. याकडे लक्ष देत त्वरित फोन सेवा सुरू करावी, अशी मागणीही प्रवाश्यांनी केली आहे.